‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:45 IST2025-10-01T12:45:37+5:302025-10-01T12:45:50+5:30
या घटनेनंतर धनगर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
आळंद (छत्रपती संभाजीनगर): धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ रघुनाथ दांगोडे (वय 38) असे आहे. ते खामगाव गोरक्ष गावातील शेतकरी असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे.
मानसिक नैराश्यातून टोकाचा निर्णय
धनगर आरक्षणासाठी जालना येथे आमरण उपोषण सुरू असून, सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने गोपीनाथ दांगोडे हे तीव्र मानसिक तणावात होते. मंगळवारी मध्यरात्री त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. बुधवारी सकाळी ते घरी न दिसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, ते मृतावस्थेत सापडले. घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी
पोलिसांना त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “मी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे, आम्हाला धनगर समाजास आरक्षण मिळत नाही म्हणून मी बलिदान देत आहे. मुख्यमंत्री साहेब, माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये. एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे.”
संतप्त धनगर समाजाचे आंदोलन
या घटनेनंतर धनगर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नागरिकांनी खामगाव फाटा (जळगाव महामार्गावर) तातडीने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी आरक्षणाबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांना दिले. दरम्यान, तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जीव दिल्यामुळे धनगर समाजात तीव्र दुःख आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. आता या घटनेनंतर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.