मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:21 IST2025-03-17T14:20:15+5:302025-03-17T14:21:14+5:30
गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, संजय केणेकर यांनी बाजी मारली.

मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी
छत्रपती संभाजीनगर : भाजपने विधान परिषदेच्या रिक्त जागांवर प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात एक आणि विदर्भात दोन अशा तीन जागांवर भाजपने रविवारी उमेदवारी जाहीर केली. त्यात केणेकर यांचे नाव असून, ते १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ रोजी मतदान होईल. प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा भाजपच्या वाट्याला आल्या. या तिन्ही रिक्त जागांचा कार्यकाळ मे २०२६ पर्यंत असल्यामुळे १३ महिन्यांची संधी भाजपच्या समीर जोशी, दादाराव कैचे आणि केणेकर यांना मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, केणेकर यांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपमधील स्थानिक व विभागातील स्पर्धकांमध्ये नाराजीचा सूर उमटला तर केणेकर समर्थकांनी जल्लोष केला. केणेकर यांना २०१४ साली विधानसभेत संधी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून माघारी यावे लागले होते. त्यानंतर शहराध्यक्ष या पदावर त्यांना संधी देण्यात आली. सध्या ते प्रदेश सरचिटणीस आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेवर केणेकर यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपने रविवारी विधान परिषदेच्या तीन जागांसाठी घोषणा केली. यात दादाराव कैचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे.
मायक्रो ओबीसी चेहरा...
१९८८ साली अ.भा.वि.प. मधून केणेकर यांनी राजकीय प्रवास सुरू केला. पुढे भाजप वॉर्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष अशी १२ वर्षे संघटनात्मक काम त्यांनी केले. १५ मनपात नगरसेेवक म्हणून काम केले. उपमहापौर म्हणून पक्षाने संधी दिली. शहराध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस या पदापर्यंत त्यांनी काम केले. बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालेले केणेकर सध्या ५५ वर्षांचे आहेत. मायक्रो ओबीसी चेहरा म्हणून केणेकर यांचा विचार झाला आहे.