छत्रपती संभाजीनगरांचे पाण्याचे नियोजन बिघडले, आठव्या दिवशी येणारे पाणी अकराव्या दिवशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 19:29 IST2025-07-19T19:29:07+5:302025-07-19T19:29:47+5:30
शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलल्याचे परिणाम

छत्रपती संभाजीनगरांचे पाण्याचे नियोजन बिघडले, आठव्या दिवशी येणारे पाणी अकराव्या दिवशी!
छत्रपती संभाजीनगर : चितेगाव येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी दोन दिवस लागले. त्यामुळे सिडको-हडकोसह जुन्या शहराचा पाणीपुरवठा चक्क दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. ज्या नागरिकांना आठ दिवसानंतर पाणी मिळत होते, त्यांना आता थेट अकराव्या दिवशी पाणी मिळणार आहे. प्रत्येक घरातील पाणीसाठ्याचे नियोजनच बिघडले. अनेक नागरिकांना खासगी टँकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
१४ जुलै रोजी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत बिघाड निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा सहा तास बंद होता. वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यानंतर १६ रोजी चितेगाव येथे १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी नॅशनल हायवेच्या कामामुळे फुटली. दुरुस्तीला २३ तास लागले. २३ तासांच्या खंडामुळे पुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले. पाच दिवसांआड नागरिकांना पाणी देण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून नेहमी करण्यात येतो. प्रत्यक्षात अनेक वसाहतींना ७ व्या, तर ९ व्या दिवशी पाणी मिळते.
आता दोन दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याने संबंधित नागरिकांना आठव्या, तर काहींना अकराव्या दिवशी पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे. सिडको-हडको भागातील छोट्या घरांमध्ये पाणी साठविण्यासाठी जागा नसते. सहा ते सात दिवस जाईल, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करून ठेवण्यात येते. पाणी येणार नसल्याने खासगी टँकर मागवावे लागत आहेत. पिण्यासाठी जारचा आधार घ्यावा लागतोय.