खाकीतली ताकद, अमेरिकेत विजय! वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर स्पर्धेत रवींद्र साळवेंना सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:11 IST2025-07-09T12:10:41+5:302025-07-09T12:11:35+5:30
छत्रपती संभाजीनगरच्या रवींद्र साळवे यांनी अमेरिकेत फडकावला तिरंगा; जिंकले सुवर्ण व कांस्य

खाकीतली ताकद, अमेरिकेत विजय! वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर स्पर्धेत रवींद्र साळवेंना सुवर्ण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र साळवे यांनी अमेरिकेतील बिरमिंघम अलाबामा येथे २६ जून ते ७ जुलैदरम्यान झालेल्या २१ व्या वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर गेम्स या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त फिटनेस आणि कौशल्याच्या बळावर भीमपराक्रम करताना सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत वैजापूर पोलिस ठाण्यात नियुक्त हेडकॉन्स्टेबल असणाऱ्या रवींद्र साळवे यांनी पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्ण आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्य जिंकत पदकांचा डबल धमाका केला आणि अमेरिकेत तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला.
या स्पर्धेत जगभरातील ९० पेक्षा जास्त देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे रवींद्र साळवे यांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे पार पडलेल्या वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर गेम्समध्ये पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या यशाबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधीक्षक भागवत फुंदे, उपविभागीय पोलिस अधीक्षक पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रवीकुमार दरवडे, सत्यजित ताईतवाले, जगेश दैत्य, सुरेश वर्मा, सौरभ कल्लोळे, वैभव थोरात आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.