छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 20:00 IST2025-08-30T20:00:42+5:302025-08-30T20:00:59+5:30
आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार!
छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षात शहराला दररोज पाणी देण्याचे उद्दिष्ट मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डोळ्यासमोर ठेवले आहे. जानेवारी २०२६ पासून शहरात दररोज किमान ३७१ एमएलडी पाणी येईल. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी देणे सहज शक्यही होईल. त्यापूर्वी प्रत्येक नळाला मीटर बसविण्याची योजना असून, त्यासाठी डीपीआर (प्रकल्प आराखडा) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी दिले.
२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले. या योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातून शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवीन वर्षात पाणी देण्याचे आदेश दिले. त्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेतून सध्या शहराला १७१ एमएलडी पाणी मिळत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये किमान ३० जलकुंभ नवीन बांधले जातील. याचाही वापर केला जाईल. ज्या भागात जलवाहिन्या नव्हत्या, त्या भागात जवळपास १२०० किमी लांबीच्या जलवाहिन्याही टाकण्यात आल्या. गुंठेवारी भागातील या नवीन वसाहतींनाही दररोज पाणी दिले जाईल. सध्या महापालिकेकडून २५०० रुपये पाणीपट्टी घेतली जाते. योजना पूर्ण झाल्यावर शहरवासीयांना दररोज पाणी मिळणार आहे. या योजनेवर वॉटर मीटर लावून पाण्याचे बिल वसूल केले जाईल. महापालिकेने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
मीटर वादाचा विषय ठरणार
स्मार्ट सिटीमार्फत मनपाने यापूर्वी ५ हजार स्मार्ट वॉटर मीटर खरेदी केले. याचा उपयोगच झाला नाही. ते मीटर आजही पडून आहेत. आता नवीन कंपनी शोधून वॉटर मीटर बसविले जातील. त्यामुळे नागरिक, राजकीय मंडळींचा रोष वाढेल. वॉटर मीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, मीटरचा प्रकार, सॉफ्टवेअर, बिलिंगची प्रक्रिया, नियंत्रण ठेवण्यासाठी कॉमन कंट्रोल सेंटर इ. तयार करावे लागेल. या सर्व कामांचा एक डीपीआर आधी तयार केला जाईल. तो तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश प्रशासकांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.