सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:11 IST2026-02-09T16:10:16+5:302026-02-09T16:11:12+5:30
दिग्गज नेत्यांच्या वारसांनी राखलं वर्चस्व, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा वारसांची सरशी.

सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या वारसांनी बाजी मारत आपले राजकीय वर्चस्व अबाधित राखले आहे. शिंदेसेनेचे खासदार संदीपान भूमरे, आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कुटुंबातील युवा नेतृत्वाने आपापल्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकावली आहे. नेत्यांच्या वारसांना मिळालेली ही संधी आगामी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी ठरेल.
सिल्लोडमध्ये आमेर सत्तारांचा भाजपला धक्का
सिल्लोडमध्ये पुन्हा एकदा आमदार अब्दुल सत्तार यांची जादू चालली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंभई गटात अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र आमेर सत्तार यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा पराभव केला. या विजयाने सिल्लोडमधील सत्तारांचे एकतर्फी वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
पाचोडमध्ये शिवराज भूमरेंचा 'महाविजय'
राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भूमरे यांचे पुतणे शिवराज भूमरे यांनी पाचोड गटात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भूमरे घराण्याची ताकद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरली होती. अखेर मतदारांनी शिवराज भूमरे यांच्या बाजूने कौल देत राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढले.
गणोरीत निखिल चव्हाणांनी थोपवली महाविकास आघाडी
भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतण्या निखिल चव्हाण यांनी गणोरी गटात विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बोरसे यांनी दिलेली मोठी टक्कर निकामी ठरवत निखिल चव्हाणांनी संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.