छत्रपती संभाजीनगर जि.प.साठी महायुती: २७ जागा घेत भाजप मोठा भाऊ, शिंदेसेनेला २५ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:53 IST2026-01-21T15:51:56+5:302026-01-21T15:53:21+5:30
छत्रपती संभाजीनगर जि.प.च्या ५२ जागांवर भाजप-शिंदेसेनेची महायुती, सिल्लोडमध्ये आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर जि.प.साठी महायुती: २७ जागा घेत भाजप मोठा भाऊ, शिंदेसेनेला २५ जागा
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत सपाटून फटका बसल्यानंतर शिंदेसेना नरमली. दोन पाऊल मागे येत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागा वाटपात भाजपपेक्षा दोन जागा कमी घेतल्या. २७ जागा घेत भाजप मोठा भाऊ, तर २५ जागा घेत शिंदेसेना लहान भाऊ होण्यावर राजी झाली. रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये भाजप व शिंदेसेनेच्या मंत्री, खासदार, आमदारांच्या बैठकीनंतर युतीचा निर्णय जाहीर झाला.
सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निमंत्रणाला धुडकावत स्वबळाचा नारा दिल्यामुळे तेथील ११ गटांमध्ये भाजप व शिंदेसेनेची युती तुटली आहे. तेथे दोन्ही पक्ष थेट आमने-सामने लढणार आहेत. मैत्रीपूर्ण लढतीचा येथे मुद्दाच राहणार नाही, असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दोन बैठकीतच युतीचा निर्णय झाला. युतीच्या घाेषणेनंतर वैजापूरमधील कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांना घेराव घालून युती तोडण्याची मागणी केली.
सिल्लोडकरांचा सवतासुभा...
जिल्हा परिषदेसाठी ६३ गट आहेत. त्यातील २५ जागा या शिंदेसेना, तर २७ जागा भाजप लढणार आहे. सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील ११ ठिकाणी युती झाली नाही. त्या ठिकाणी भाजप आणि शिंदेसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. इतर तालुक्यांतील २७ व सिल्लोड-सोयगांवमधील ११ मिळून ३८ जागा भाजप लढणार आहे. तर, शिंदेसेना ३५ जागा लढणार आहे. ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट जास्त, त्यांचा जि.प.अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान मी स्वतंत्र लढणार असे शिंदेसेनेचे आ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे, तिथे युती झाली नाही, असे पालकमंत्री शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री सावे यांनी स्पष्ट केले. भाजप-शिंदेसेनेची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यांत असणार आहे.
महायुतीची घोषणा होताच संताप...
मनपा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी युतीसाठी दोन बैठका झाल्यानंतर युती झाल्याची घोषणा शिंदेसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, तर भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर वैजापूर तालुक्यातील आठपैकी तीन जागा मिळणार असल्यामुळे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देत रेल्वेस्टेशन समोरील हॉटेलसमोर संताप केला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. युती तोडा असे म्हणत कार्यकर्त्यांनी युतीला विरोध करीत मंत्री सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करीत वाहने अडविली. त्यामुळे काही काळ गदारोळाचे वातावरण होते. परंतु, पोलिसांच्या वाहनातून बंदोबस्तात मंत्री अतुल सावे मध्यवर्ती कार्यालयाकडे निघून गेले. अनेक वर्षे भाजप निवडणुकीची तयारी करीत असताना, जागा शिंदेसेनेला गेली. वैजापुरातील काही जागांवर भाजप नेत्यांना शिव्या देणारा उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता आम्ही त्या उमेदवारासाठी काम करायचं का?, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना केला.
जि.प. अध्यक्ष महायुतीचा होईल...
२७ ठिकाणी भाजप, शिंदेसेना २५ ठिकाणी लढेल. ११ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल. ५२ ठिकाणी युती झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अध्यक्ष महायुतीचा होईल. मनपामध्ये अनेक इच्छुक होते, त्यामुळे युती झाली नाही. आ. अब्दुल सत्तार बैठकीला आले नसून, त्यांनी स्वत: लढणार असल्याचे जाहीर केले. सिल्लोडमध्ये समोरासमोर लढू. आता सत्तारांची खेळी काय माहिती नाही, ते वेगळा पक्ष स्थापन करतात की काय, हे ही माहिती नाही. पण, सिल्लोडमध्ये युती नाही.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री