छ. संभाजीनगर पाणी योजना: १०० कोटींच्या जॅकवेलची अग्निपरीक्षा यशस्वी; गोदामाईचे पाणी स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:25 IST2026-03-21T12:20:45+5:302026-03-21T12:25:02+5:30
जायकवाडी जॅकवेलमध्ये लिकेज नाही; २२ मार्चला पंप सुरू करून जलवाहिनी स्वच्छ करणार

छ. संभाजीनगर पाणी योजना: १०० कोटींच्या जॅकवेलची अग्निपरीक्षा यशस्वी; गोदामाईचे पाणी स्थिर
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर पाणी घेण्यात आले. मागील २४ तासांत पाणी जशास तसे असून, जॅकवेलमध्ये कुठेही लिकेज नाही. २२ मार्चपर्यंत जॅकवेलमध्ये पाच मीटरपर्यंत पाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंप सुरू करून पाणी मुख्य जलवाहिनीत घेतले जाईल. टप्प्याटप्प्याने जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू होणार असून, न्यायालयानेही या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी धरणात १०० कोटी रुपये खर्च करून जॅकवेलची उभारणी करण्यात आली आहे. जॅकवेलमध्ये गुरुवारी सायंकाळी ४:४० वाजता गोदामाईच्या विशाल पात्रातील पाणी सायफन पद्धतीने घेतले. काही मिनिटांमध्ये जॅकवेलची पाणीपातळी पाच मीटरपर्यंत पोहोचली. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाणीपातळी जशास तशी होती. किंचितही पाणी कमी झालेले नव्हते. त्यामुळे जॅकवेलला कुठेही लिकेज नसल्याचे लक्षात आले. जॅकवेलच्या आसपासही पाहणी केली. कुठूनही पाणी बाहेर येत नसल्याचे दिसून आले. रविवारी सकाळपर्यंत पाणी जशास तसे जॅकवेलमध्ये ठेवले जाणार असून, २२ रोजी सकाळी सर्व तपासण्या करून पंप सुरू केले जातील. पंप सुरू करून जॅकवेलमधील पाणी मुख्य जलवाहिनीत घेण्यास सुरुवात होणार आहे. हळूहळू जलवाहिनी शुद्ध केली जाईल. न्यायालयानेसुद्धा या प्रक्रियेला संमती दिली आहे.
प्रमाणपत्र दिले मात्र...
जॅकवेल वापरण्यासाठी १०० टक्के योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय पाणी घेता येणार नाही, अशी भूमिका गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतली होती. जीव्हीपीआर कंपनीने तातडीने प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्रावर सही कोणाची या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांनी वाद घातला. कंपनीने अधिकृत केलेल्या जबाबदार अधिकाऱ्याची सही असतानाही मजीप्राने विषय लांबविला. मजीप्रा आणि कंत्राटदार कंपनीतील वाद आता अधिक विकोपाला जात असल्याचे उघड होत आहे.