मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडीच्या नवीन जॅकवेलमध्ये आज पाणी घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:18 IST2026-03-19T14:18:34+5:302026-03-19T14:18:34+5:30
२७४० कोटींची पाणी योजना: जॅकवेलची चाचणी सुरू, २२ मार्चला जलवाहिनीतून उपसा; नागरिकांना मात्र प्रतीक्षाच

मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडीच्या नवीन जॅकवेलमध्ये आज पाणी घेणार
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात जवळपास १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जॅकवेल (पाणी उपसा विहीर) मध्ये पाडव्याचा मुहूर्त साधून पाणी घेण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवस जॅकवेलमध्ये पाणी साठवून कुठे गळती तर नाही ना, याची खात्री केली जाईल. जॅकवेलला कुठेही गळती नसल्याचे लक्षात आल्यावर मुख्य जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी घेतले जाणार आहे. शहरवासीयांना अतिरिक्त पाण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी अतिरिक्त पाणी शहराला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाच्या संमतीनुसार १९ मार्चला जॅकवेलमध्ये पाणी घेतले जाणार आहे. बुधवारी रात्री मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत जॅकवेलची पाहणी केली. पाणी घेण्यापूर्वी विविध उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. गुरुवारी सकाळी सायफन पद्धतीने धरणातील पाणी जॅकवेलमध्ये घेतले जाणार आहे. जॅकवेल पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कुठे गळती तर नाही, हे तपासले जाईल. त्यानंतर सर्व यंत्रणेची तपासणी होईल.
पूरसदृश परिस्थिती
जॅकवेलमधील पाणी ३ हजार ७०० अश्वशक्तीच्या पंपद्वारे जलवाहिनीत २२ मार्चला घेतले जाणार आहे. जलवाहिनीवर ठराविक अंतरावर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. जलवाहिनी शुद्ध करण्यासाठी ज्या ठिकाणी नदी, नाले आहेत, तेथे अशुद्ध पाणी सोडले जाईल. एकूण १२ ठिकाणी अशा पद्धतीचे व्हॉल्व्ह आहेत. त्यात ॲप्रोच बंड चेनेज, साखर कारखाना, धनगाव, ढोरकीन, कौडगाव, निलजगाव, फारोळा, आर. एल. स्टील, अजित सीड्स, निसर्ग नर्सरी येथे पाणी सोडण्यात येईल. पाणी सोडल्यानंतर संबंधित भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.
९०० ची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी मागील वर्षी टाकली. ही जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू नाही. मनपाची सर्वांत जुनी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे बंद करून ९०० ची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करावी. या जलवाहिनीतून दररोज ७२ ते ७५ एमएलडी पाणी शहराला द्यावे, अशी मागणी मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे केली.