जायकवाडीच्या जॅकवेलमध्ये अखेर गोदामाईचे पाणी! सायफन पद्धतीने पाणी घेण्याचे मिशन फत्ते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:49 IST2026-03-20T19:45:34+5:302026-03-20T19:49:06+5:30
२७०० कोटींची नवी पाणी योजना: २० महिन्यांत जॅकवेलचे काम पूर्ण; १४ एप्रिलला नक्षत्रवाडीत पाणी पोहोचवण्याचे प्रशासनाचे लक्ष्य

जायकवाडीच्या जॅकवेलमध्ये अखेर गोदामाईचे पाणी! सायफन पद्धतीने पाणी घेण्याचे मिशन फत्ते!
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात गुरुवारी सायंकाळी ४:४० वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाला यश आले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी जॅकवेलमध्ये उभे राहून पाण्याचे दोन घोट प्राशन करीत गोदामाईचे आभार मानले. आता जॅकवेलमध्ये पाणी काही तास साठवून ठेवले जाईल. त्यानंतर या पाण्याचा प्रवास ३८ किमी लांब मुख्य जलवाहिनीतून शहराकडे सुरू होईल.
गुढीपाडव्याच्या शुभ मुर्हूतावर जॅकवेलमध्ये पाणी घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच न्यायालयानेही संमती दिली होती. धरणातील पाणी गुरुवारी सकाळी ११:०० वाजता सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये घेण्यात येणार होते. परंतु, किरकोळ तांत्रिक अडचण आली त्यावर मात करण्यासाठी जवळपास सहा तास लागले. सायंकाळी ४:४० वाजता जॅकवेलमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. धरणात ३४ मीटर खोल जॅकवेलमध्ये मनपा आयुक्त उभे होते. फेसाळलेले पांढरेशुभ्र पाणी आत आल्यावर ते पाणी त्यांनी प्राशन केले. आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
जॅकवेलमध्ये साडेचार मीटरपर्यंत पाणी घेण्यात आले. शुक्रवारी आणखी काही प्रमाणात पाणी घेऊन विविध टप्प्यांवर कुठे लिकेज तर नाही, याची खात्री केली जाईल. जॅकवेलमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाणी साठवून ठेवण्यात येईल. कुठेही लिकेज नसल्याची खात्री झाल्यावर पंपाची टेस्टिंग सुरू होईल. पंप यशस्वीपणे काम करीत असतील तर पाणी २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यात घेण्यात येईल. चार ते पाच किमी अंतरापर्यंत जलवाहिनी स्वच्छ केली जाणार असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
१४ एप्रिलला नक्षत्रवाडीत पाणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हे पाणी आणत असताना छोट्या-छोट्या त्रुटी दुरुस्त करणे, कुठे अडचण आली तर त्यावर मात करण्याचे काम अविरतपणे सुरू राहणार आहे. एप्रिल अखेरीस शहरात २०० एमएलडी पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहाटेपर्यंत अधिकारी नाथसागरावर
जॅकवेलमध्ये पाणी घेण्यापूर्वी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मनपा आयक्त जी. श्रीकांत यांच्यासह पहाटे ३:०० वाजेपर्यंत मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथु, खलील खान उपस्थित होते.
२० महिन्यांत जीव्हीपीआरचे यश
हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला योजनेचे काम देण्यात आले. कंपनीला काम सोडून जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर कंपनीने कामाला गती दिली. कोरोना काळात मजूर नव्हते. त्यानंतर कंपनीने काम केले. मे २०२४ मध्ये जॅकवेलच्या कामासाठी पीसीसी सुरू केले. त्यानंतर अवघ्या २० महिन्यांत जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण केला. जॅकवेलच्या कामासाठी निविदेनुसार ३६ महिन्यांचा कालावधी होता. दररोज सरासरी ३०० मजूर योजनेवर काम करीत होते.
योजनेचे महत्त्वपूर्ण टप्पे
-२०१९ - १,६८० कोटी रुपयांच्या पाणी योजनेची घोषणा.
-२०२० -तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन.
-२०२१- जीव्हीपीआर कंपनीसोबत निविदेनुसार करार.
-२०२२- जॅकवेलच्या कामाचे डिझाइन मंजूर.
-२०२४- नाथसागरात सौम्य ब्लास्टिंग करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी.
-२०२४- जॅकवेलच्या कामासाठी पीसीसी सुरू.
-२०२६-जॅकवेलचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण.
-१९ मार्च २०२६ सायंकाळी जॅकवेलमध्ये आले पाणी.
शहरवासीयांचे मनपूर्वक अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या सहकार्याने आज जॅकवेलमध्ये पाणी आले. शहरवासायींचेही या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी आणण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील.
-जी. श्रीकांत, मनपा आयुक्त.