पोहण्याचा मोह जीवावर बेतला! छत्रपती संभाजीनगरजवळील तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:19 IST2026-03-06T15:18:06+5:302026-03-06T15:19:01+5:30
फुलंब्री पोलिसांकडून मृतदेह बाहेर; बायजीपुरा आणि नायगावच्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून अंत

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! छत्रपती संभाजीनगरजवळील तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर):छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव लगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (६ मार्च) सकाळी १० वाजेच्या सुमारास ही माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढले.
काठावर सापडले बूट आणि मोबाईल
मृतांमध्ये शेख रिहान शेख अहमद (१८, रा. बायजीपुरा) आणि इम्रान शेख इरफान शेख (१७, रा. नायगाव) यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हे दोघे नायगाव-गणोरी रस्त्यावरील तलावात पोहण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी दोघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांचे बूट आणि दोन मोबाईल आढळून आले, ज्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा संशय बळावला.
दोन तासांच्या शर्थीनंतर मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. सुमारे दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. इम्रान हा पेंटिंगचे काम करायचा, तर रिहान लाईट फिटिंगचे काम करायचा. दोन तरुण मुलांचा असा अचानक अंत झाल्याने नायगाव आणि बायजीपुरा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.