रंगाचा बेरंग, किरकोळ कारणातून गारखेड्यासह वाळूजमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:52 IST2026-03-05T12:51:37+5:302026-03-05T12:52:58+5:30
गारखेड्याच्या इंदिरानगरात रात्री रहिवाशांच्या घरावर दगडफेक, लाठ्या काठ्यांनी वीजमीटर, वाहनांची तोडफोड

रंगाचा बेरंग, किरकोळ कारणातून गारखेड्यासह वाळूजमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, दगडफेक
छत्रपती संभाजीनगर : धुळवडीदरम्यान रंग लावण्यावरून, स्थानिक वादातून शहरात अनेक भागांत किरकोळ हाणामारीच्या घटना घडत असतानाच गारखेडा व वाळूजमध्ये मात्र दोन गट किरकोळ कारणावरून आमनेसामने येत तणाव निर्माण झाला. लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने हाणामाऱ्या झाल्या. गारखेड्यात दिवसा झालेल्या वादाचे पर्यावसान रात्री दगडफेकीत झाल्याने रात्रभर तणाव निर्माण झाला. जवाहरनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करत सातपेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेतले.
गारखेड्यातील इंदिरानगर धूलिवंदनाच्या दिवशी दुपारनंतर खदखदत राहिले. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले. यात संतोष विष्णू खरात याच्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी भारत, निखिल व जावेद यांच्यात वाद सुरू होते. संतोषने ते वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून गुलाब, सत्तार खान यांनी त्याला मारहाण केली. वाद वाढताच हल्लेखोरांनी त्याच्या दोन बहिणी, वहिनीलाही मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे. तर सत्तार खान मोहम्मद गौस खान याच्या तक्रारीत विकास खरात, आकाश खरात, याेगेश खरात, संतोष खरात यांनी दुपारी २ वाजता त्याची वाट अडवली. त्यातून वाद होत मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.
अज्ञातांची दगडफेक, दंगा काबू पथक तैनात
वादानंतर जखमींसह जमाव जवाहरनगर ठाण्यात गेला. पाेलिसांनी जखमींना मेडिकल मेमो देऊन तपासणीसाठी पाठवले. काही आरोपींना ठाण्यातच बसण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरा एका गटातील संशयिताने अचानक चक्कर येत असल्याचे नाटक केले. परिणामी, पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला रुग्णालयात नेण्याची मुभा दिली. त्याच्या काही वेळातच रात्री ११ वाजता इंदिरानगरमध्ये १२ ते १५ जणांच्या गटाने स्थानिकांना शिवीगाळ करत दगडफेक केली. लाठ्या काठ्यांनी विजेचे मीटर व सहा ते सात दुचाकी फोडल्या. यात योगेश खरात याचीही दुचाकी फोडण्यात आली. परिसरात तणाव निर्माण झाला. दोन्ही गट समोरासमोर आले. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, निरीक्षक सचिन कुंभार, सहायक निरीक्षक आतिश लोहकरे, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी फौजफाट्यासह परिस्थिती नियंत्रणात आणली. बुधवारीही परिसरात दंगा काबू पथक तैनात होते. या तोडफोडीप्रकरणी राजू जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात गटावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
जमावाचा ठाण्यासमोर ठिय्या
या घटनेनंतर खरात कुटुंबासह इंदिरानगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने बुधवारी दुपारी जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर जमले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ हेही आले. तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव परतला. रात्रीपर्यंत ७ पेक्षा संशयितांना ताब्यात घेतले होते.
अवैध व्यवसाय आणि वादाला कारण
स्थानिक कारणांतून हे वाद झाल्याचे सांगितले जात असताना अवैध व्यवसायाची या वादाला किनार असल्याची चर्चा बुधवारी होती. इंदिरानगरमध्ये अनेक महिन्यांपासून काही गुन्हेगार अवैधरीत्या दारू विकतात. त्यातून अवैध व्यावसायिक गुंडगिरी करतात. त्याच गटाने ही दगडफेक केल्याचा संशय जमावाने व्यक्त केला. त्या सर्वांवर कठोर कारवाईचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.