अंभईत पैशाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; २० वाहने फोडली, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:30 IST2026-02-25T12:28:40+5:302026-02-25T12:30:43+5:30
पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावास पांगवले; गावाला आले छावणीचे स्वरूप

अंभईत पैशाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; २० वाहने फोडली, दोघे गंभीर जखमी
सिल्लोड : तालुक्यातील अंभई येथे शेळ्या विक्रीच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून मंगळवारी रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या तुफान दगडफेकीत दोन जण गंभीर, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. जमावाने रस्त्यावरील सुमारे १५ ते २० वाहने फोडून दुकानांचे मोठे नुकसान केले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
अंभई येथील मुख्य चौकात शेळ्या विक्रीच्या पैशांच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. याचे रूपांतर काही वेळातच दोन गटांतील तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी जवळपास एक हजार लोकांचा जमाव जमल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लाठ्या- काठ्या आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. यात सागर भगवान ढगे आणि विक्रम गव्हाणे (दोघेही रा. अंभई) यांच्या डोक्याला दगड लागल्याने व बेदम मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी प्रारंभी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच यावेळी राहुल मुंढे, करण मुंढे, अमोल पंडित दुतोंडे आणि पिंटू मुंढे, हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, अजिंठ्याचे पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, सिल्लोड ग्रामीणचे रवींद्र ठाकरे, शहरचे पोनि शेषराव उदार यांच्यासह मोठा फौजफाटा आणि दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला. रात्री उशिरा पोलिसांनी गावात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गावाला आले छावणीचे स्वरूप
जमावाने केलेल्या दगडफेकीत मोटारसायकल, काळी-पिवळी, क्रूझर आणि खासगी गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. रस्त्यावर दगडांचा खच पडला असून, अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. सध्या गावात चौकाचौकांत पोलिस तैनात करण्यात आले असून, गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.