मुलीची हत्या करून प्रेत गादीत बांधलं, रिक्षातून घाटात विल्हेवाट लावताना आई-वडील जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:10 IST2026-02-20T12:10:03+5:302026-02-20T12:10:42+5:30
गादी संशयास्पद जड वाटल्याने रिक्षाचालकाने पोलिसांना कळवले, ज्यामुळे हा प्रकार उघड झाला.

मुलीची हत्या करून प्रेत गादीत बांधलं, रिक्षातून घाटात विल्हेवाट लावताना आई-वडील जेरबंद
छत्रपती संभाजीनगर: शहरात एकीकडे शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच, दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या २१ वर्षीय मुलीची हत्या करून तिचे प्रेत गादीत गुंडाळून रिक्षाने विल्हेवाट लावायला नेणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले. एका सतर्क रिक्षावाल्यामुळे हा थरार उघडकीस आला असून, वाळूज महानगर आणि तिसगाव परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पतीने सोडल्याने आई-वडिलांकडे होती मुलगी
नंदिनी राजू धिवरे (२१, रा. वडगाव कोल्हाटी) असे मयत तरुणीचे नाव आहे. नंदिनीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, मात्र काही दिवसांपूर्वीच पतीने तिला सोडून दिल्याने ती आई भारती साबळे आणि वडील उमेश साबळे यांच्याकडे राहायला आली होती. तेव्हापासून घरात सतत भांडणे होत होती. याच रागातून शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आई भारती हिने बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने नंदिनीचा गळा आवळून तिची हत्या केली.
रिक्षावाल्याची सतर्कता ठरली मोलाची
संध्याकाळी पती उमेश घरी आल्यावर या दांपत्याने पुरावा नष्ट करण्याचे ठरवले. त्यांनी नंदिनीचा मृतदेह एका गादीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुंडाळला आणि घरगुती सामान असल्याचे भासवून कन्नडकडे जाण्यासाठी रिक्षा (MH-20-EF-2612) भाड्याने केली. मात्र, गादी संशयास्पद वाटल्याने आणि ती उचलताना अनपेक्षित जड वाटल्याने रिक्षाचालकाला संशय आला. त्याने तातडीने यापूर्वी संपर्कात असलेल्या पोलीस अंमलदाराला गोपनीय माहिती दिली.
पोलिसांनी रचला तिसगाव फाट्यावर सापळा
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे आणि पथकाने तिसगाव फाट्यावर रिक्षा अडवली. पोलिसांनी गादी उघडून पाहताच त्यात नंदिनीचा मृतदेह आढळला. "मुलीने गळफास घेतला असून अंत्यसंस्कारासाठी गावी चाललो आहोत," अशी बतावणी आई-वडिलांनी केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आई भारती हिने हत्येची कबुली दिली.
पुढील कारवाई
पोलिसांनी भारती उमेश साबळे आणि उमेश गोविंद साबळे या दांपत्याला ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यांच्यावर BNS कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.