छत्रपती संभाजीनगर हादरले! हॉटेलमध्ये चुकीच्या खोलीत प्रवेश अन् विवाहितेवर तिघांचा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:34 IST2025-12-19T11:32:58+5:302025-12-19T11:34:08+5:30
हॉटेलमध्ये खोली बुकिंगवेळी दिलेल्या एका क्रमांकावरून बारा तासांत आरोपी अटक

छत्रपती संभाजीनगर हादरले! हॉटेलमध्ये चुकीच्या खोलीत प्रवेश अन् विवाहितेवर तिघांचा अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : भेटायला आलेल्या मित्रासोबत हॉटेलवर बियर पिल्यानंतर मित्राला झोप लागली. त्यानंतर खोली बाहेर आलेल्या तरुणीला त्याच मजल्यावरील दुसऱ्या खोलीतील तरुणांनी आणखी बियर पाजून सामूहिक अत्याचार केला. १७ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल ग्रेेट पंजाबमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने थेट वेदांतनगर ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.
ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५), घनश्याम भाऊलाल राठोड (२७, दोघे रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहरनगर), किरण लक्ष्मण राठोड (२६, रा. भानुदास नगर, जवाहरनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ३२ वर्षीय पीडिता शहरातील एका रुग्णालयात नोकरीला आहे. काही दिवसांपासून ती आर्थिक अडचणीत हाेती. त्यामुळे तिने तिच्या एका मित्राला शहरात भेटण्यासाठी बोलावले होते. १७ डिसेंबरच्या रात्री ते दोघे रेल्वेस्थानक परिसरात भेटले. यानंतर रात्री त्यांनी सोबत बियर पिण्याचे नियाेजन केले. त्यासाठी तिच्या मित्राने जवळीलच हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये खोली बुक केली. तेथे पीडित तरुणी व तिच्या मित्राने सोबत बियर पिली. मात्र, अधिक नशेच्या अमलाखाली गेल्याने तिचा मित्र झोपी गेला. यादरम्यान तरुणी खोलीबाहेर आली होती.
खोली क्रमांक १०५ ऐवजी २०५ मध्ये गेली
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा वेळ खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी ऋषिकेश, घनश्याम व किरण दारूचे सेवन करत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली. मात्र, एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बियर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली व तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.
संतप्त तरुणीची ठाण्यात धाव
पहाटे ५ वाजता तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिला अतिप्रसंगाची जाणीव झाली. तिने तत्काळ वेदांतनगर ठाणे गाठले. सामूहिक अत्याचाराची तक्रार आल्याचे कळताच सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संगीता गिरी, अंमलदार रणजित सुलाने, मनोज चव्हाण, प्रवीण मुळे यांनी आरोपींचा शोध सुरू केला.
एका क्रमांकावर आवळल्या तिघांच्या मुसक्या
तिन्ही आरोपी मित्र असून फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचे काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी खोली बुक केली होती. यादरम्यान त्यांनी एकाचा क्रमांक दिला होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून सायंकाळपर्यंत तिघांच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, अत्याचाराच्या घटनेनंतरही पीडित तरुणीच्या मित्राला शुद्ध नव्हती. पीडित तरुणी विवाहित असून तिला एक मुलगा आहे. घटनेची माहिती कळताच तिचा पतीदेखील सकाळी ठाण्यात दाखल झाला होता. दरम्यान, तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले.