१२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:11 IST2026-03-27T19:11:40+5:302026-03-27T19:11:51+5:30

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एकाला अटक, मुख्य आरोपी फरार

Chhatrapati Sambhajinagar: ₹1.12 Crore Investment Fraud via Fake Dubai-Mauritius Based Company | १२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा

१२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : दुबई व मॉरिशस देशात कंपनीचा विस्तार असल्याचे भासवून महिन्याला १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवत मुंबई व ठाण्यातील ठगांनी शहरातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. फसवणूक झालेल्या ११ गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे धाव घेतल्यानंतर सिडको ठाण्यात १.१२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुप्रसाद शंकर चव्हाण, सुपर्णा गुरुप्रसाद चव्हाण (दोघे रा. बाजेपार्क, विरार वेस्ट, मुंबई), विठ्ठल भागाजी तांदळे (रा. सुरेवाडी, जाधववाडी), सुधाकर शंकर खंडागळे (रा. खुलताबाद), तरुणा चव्हाण व सोनी मनचंदाणी (दोघी रा. ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. पदमा सुस्ते यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, नातेवाईक तांदळेच्या माध्यमातून सुस्ते यांचा चव्हाण दाम्पत्याशी संपर्क आला. पेमॅक्स ग्लोबल कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १२ टक्के परतावा मिळेल, असे सांगत त्यांचा विश्वास जिंकण्यात आला. तांदळेने त्याचा साथीदार खंडागळेची व्हिक्टरी ट्रेडर्स कार्यालयात भेट घडवून दिली. वाळूजमधील नामांकित कंपन्यांतील कामगारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून नफा कमावल्याचे भासवण्यात आले. जून २०२३ मध्ये जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यात आले.

१.५ लाख परतावा देत विश्वास जिंकला
सुस्ते यांनी जुलै २०२३ मध्ये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात ५ लाख रुपये गुंतवले. त्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १.५ लाख रुपये परतावा देण्यात आला. तीन-चार महिने नियमित परतावा दिल्यानंतर आरोपींनी अचानक संपर्क तोडला. त्यानंतर भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. सुस्ते यांच्यासह सोनांत कावळे (२.५ लाख), रघुनाथ सुलताने (३ लाख), अरविंद दापूरकर (५ लाख), साहेबराव कांडेकर (५.५ लाख), मिलिंद म्हस्के (१० लाख), गुलाब श्रीमंत पवार (१२ लाख), सुदाम नागरे (१५ लाख), हरिचंद्र शेवाळे (३ लाख), रतनसिंग राजपूत (११.५ लाख), नथू कोल्हे (१० लाख), प्रकाश मानकर (३० लाख) यांनीही गुंतवणूक केली.

१३ कंपन्यांचा दावा, दुबई-मॉरिशसमध्ये विस्तार
आरोपींनी पेमॅक्स ग्लोबल लिमिटेडसह एकूण १३ कंपन्या असल्याचे सांगितले, तसेच कंपनीचे मुख्य कार्यालय दुबई व मॉरिशसमध्ये असल्याचा दावा करत मोठ्या हाॅटेलमध्ये सेमीनार, प्रेझेंटेशन देत आमिष दाखवले.

फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता
चव्हाण दाम्पत्याने वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कामगारांना लक्ष्य केले होते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेतल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने सुधाकर खंडागळेला अटक केली असून सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

Web Title : दुबई-मॉरीशस की कंपनी के नाम पर 12% रिटर्न का लालच, धोखाधड़ी, मामला दर्ज।

Web Summary : दुबई-मॉरीशस कंपनी के नाम पर मुंबई और ठाणे के लोगों ने 12% रिटर्न का लालच देकर निवेशकों को ठगा। सैकड़ों लोगों से करोड़ों की धोखाधड़ी। 11 निवेशकों की शिकायत पर 1.12 करोड़ रुपये की धोखाधड़ी का मामला दर्ज।

Web Title : Dubai-Mauritius firm dupes investors with 12% return promise; case filed.

Web Summary : Mumbai and Thane individuals lured investors with a 12% return promise under the guise of a Dubai-Mauritius company. Hundreds were defrauded of crores. Police filed a case after 11 investors reported a ₹1.12 crore fraud.