'मॅजिक मशीन' दाखवत बनावट नोटा देण्याचे आमिष; छत्रपती संभाजीनगरात दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:25 IST2026-03-02T15:20:19+5:302026-03-02T15:25:02+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; 'असा' रचला होता बनाव

'मॅजिक मशीन' दाखवत बनावट नोटा देण्याचे आमिष; छत्रपती संभाजीनगरात दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी आलेल्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागात केल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.
आराेपींमध्ये शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि शेख वसीम शेख ताहेर (२९, दोघेही रा. बिलोली, नांदेड) या दोघांचा समावेश आहे. पोलिस हवालदार दीपक मालकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इनोव्हा कारमधून (टीएस ०७ जेडब्ल्यू ०६६६) दोघे जण पहाडसिंगपुरा भागात बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने दुपारी २:३० वाजेच्या सुमारास न्यू पहाडसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावर सापळा रचला. तेथे संशयित कार आणि त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींच्या कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढऱ्या कागदांचे बंडल, एक दोन बाय अडीच फुटांचा प्लायवूडचा चौकोनी बॉक्स (ज्यावर बटणे, प्लग, लाइट्स आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिले होते), आयोडिन द्रव्याची प्लास्टिकची बाटली, इलेक्ट्रिक वायर्स आणि पांढरी पावडर असा एकूण १,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
असा करीत होते विश्वास संपादन
आरोपी ५०० रुपयांच्या चलनातील नोटांना आयोडिन लावून काळे करीत. या काळ्या झालेल्या नोटा एका प्लेटवर ठेवून, वीज प्रवाह असलेला खोटा मशीनचा बॉक्स चालू करून, त्या नोटा सल्फ्युरिक पावडरने धुऊन दाखवत. त्यातील पावडरमुळे खऱ्या नोटेवरील आयोडिन निघून जाऊन नोट स्वच्छ होत असे. तीच खरी नोट बाजारात चालवण्यासाठी देऊन विश्वास संपादन केला जात होता.
एका लाखाच्या बदल्याच चार लाख
बनावट नोटा बनवून देण्याऱ्यावर विश्वास बसल्यानंतर ते एका लाखाच्या बदल्यात चार लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते. संबंधितांना पांढऱ्या कागदांचे बंडल देऊन पसार होत होते.
मालेगाव पोलिसांनी केली होती कारवाई
८ फेब्रुवारी रोजी मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी शहरातील संतोष केळसकर याला अटक केली होती. मागील वर्षीही वाळूज परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.