तिकीट काढले विमानाचे, पण चारचाकीने गाठली मुंबई; छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमान ५ तास विलंबाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:54 IST2025-11-27T08:54:05+5:302025-11-27T08:54:05+5:30
इंडिगोचे वेळापत्रक काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. मुंबईहून सायंकाळी ७:३५ वाजता उड्डाण घेऊन शहरात रात्री ८:४५ वाजता येणाऱ्या विमानास बुधवारी विलंब झाला

तिकीट काढले विमानाचे, पण चारचाकीने गाठली मुंबई; छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमान ५ तास विलंबाने
छत्रपती संभाजीनगर : इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणातील सातत्याने होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या मुंबई विमानास बुधवारी ५ तासांहून अधिक विलंब झाला. हे विमान मध्यरात्री १:३० वाजता येणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. तेव्हा नाराजी व्यक्त करीत काही प्रवाशांनी विमानप्रवासच रद्द केला, तर काही प्रवासी चारचाकीने रस्ते मार्गाने मुंबईला रवाना झाले. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांनाही प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.
इंडिगोचे वेळापत्रक काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. मुंबईहून सायंकाळी ७:३५ वाजता उड्डाण घेऊन शहरात रात्री ८:४५ वाजता येणाऱ्या विमानास बुधवारी विलंब झाला. परिणामी, रात्री ९:१५च्या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. हे विमान रात्री दीड वाजता येऊन रात्री २ वाजता मुंबईला जाणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. काही प्रवासी खासगी वाहनधारकांशी संपर्क साधून चारचाकीने मुंबईला गेले. याविषयी इंडिगोचे स्थानिक प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही.
१३२ प्रवाशांचा मुंबईत, तर १६५ प्रवाशांचा खोळंबा
या विमानाने मुंबईहून १३२ प्रवासी शहरात येणार होते, तर शहरातून १६५ प्रवासी मुंबईला जाणार होते. विमानाला विलंब झाल्याने दोन्ही ठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झाला.
गुरुवारचे विमान रद्द
इंडिगोचे गुरुवारी सकाळचे मुंबई विमान रद्द करण्यात आले आहे. त्यासाठी ‘ऑपरेशनल’ कारण असल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.