सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा! सख्ख्या भावांसह तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:53 IST2026-03-11T11:53:28+5:302026-03-11T11:53:28+5:30
पोहायला गेले अन् परतलेच नाही; ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर तलावातून काढले तिघांचे मृतदेह

सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा! सख्ख्या भावांसह तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): सिल्लोड तालुक्यातील नानेगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नानेगाव-जंजाळा मार्गावरील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण नानेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
नाथषष्ठीच्या सुट्टीमुळे शाळा बंद असल्याने उमर अनवर बेमरोट (१० वर्षे), साद अनवर बेमरोट (७ वर्षे) आणि सरफराज सलीम देहेंगल (९ वर्षे) हे तिघे मित्र सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावाजवळील तलावावर आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल भागात गेले आणि एकमेकांना वाचवण्याच्या नादात बुडाले. दुपारी २ वाजेच्या सुमारास जलपुरवठा कर्मचाऱ्याला तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
९ तासांनंतर मृतदेह सापडले
ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन शोधमोहीम राबवली. तब्बल ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजता तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री ११ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.
पोलीस यंत्रणेची अनभिज्ञता
इतकी मोठी घटना घडूनही अजिंठा पोलीस ठाण्यात याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सांगितले. मात्र, एकाच वेळी तीन मुलांचा मृत्यू होऊनही पोलिसांना याची माहिती न मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.