६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:42 IST2026-02-17T18:41:57+5:302026-02-17T18:42:46+5:30
पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी, खातरजमा करून सुरू होणार कारवाई

६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'
छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांचे रॅकेट चालवणारे स्मगलर्स, विक्रेत्यांचे थकीत पाणीपट्टी व बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवण्यासाठी ६० गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला पाठवली. खातरजमा करून आठ दिवसांतच पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली जाणार असल्याचे शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांनी गेल्या वीस दिवसांपासून विविध प्रकारच्या ड्रग्जच्या पेडलर्स, स्मगलर्सचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. २५ जानेवारीला पहिल्या कारवाईनंतर ७ फेब्रुवारीपर्यंत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकाने १६ जणांना अटक करत १३ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशफाक पटेल सध्या पसार आहे. अशपाक राज्याबाहेर गेला असला तरी त्याच्या सख्ख्या भावासह त्याच्या अन्य १५ साथीदार पोलिसांच्या हाती लागले. तर ४६ नव्या तस्करांची नावे समोर आली असून ते सर्व पसार झाले आहेत.
काय म्हटलेय पत्रात?
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना सोमवारी कारवाईबाबत पत्र पाठवले. त्यात ६० रेकॉर्डवरील गुन्हेगार, अमली पदार्थांच्या तस्करांचे नाव आणि राहत असलेले घर तसेच अन्य मालमत्तांची माहिती दिली. सदर सर्व मालमत्ता अमली पदार्थ विक्री करण्यासाठी वापरत असून ते अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या इमारती, घरांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून उच्च न्यायालयाचे आदेश व मनपाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर सर्व बांधकामे निष्कासित करावे. या कारवाईसाठी योग्य पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन पत्रात देण्यात आले आहे.
सर्वाधिक जिन्सी, सिटी चौकातील स्मगलर्स
६० जणांच्या यादीत प्रामुख्याने मुख्य तस्कर शेख अशफाक शेख इसाक पटेल (रा. रवींद्रनगर व शहाबाजार, चंपाचौक), ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव (रा. गल्ली क्र. १४, जयभवानीनगर), सय्यद फैजल उर्फ तेजा (रा. किलेअर्क), अजय व राणी ठाकूर (रा. सातारा गाव), अनिल अंबादास साळवे व अरुण अंबादास माळवे (रा. सावित्रीनगर, चिकलठाणा), आदिल बिन हमद बिन चाऊस (रा. काचिवाडा, शहाबाजार), विश्वनाथ उर्फ कोल्ह्या पिंपळे (रा. गल्ली क्र. १५, संजयनगर), विशाल छगन तामचीकर (रा. नारेगाव) यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक गुन्हेगार जिन्सी व सिटीचौक, नारेगाव परिसरातील आहेत.
आठ दिवसांत कारवाई
एकूण ७० गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यापैकी ६० गुन्हेगारांच्या मालमत्तांबाबत पत्र पाठवले आहे. त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच पोलिस बंदोबस्तात त्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल. आता सर्व बाजूने ड्रग्ज तस्करांना घेरले जाईल.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त