"डोळ्यादेखत घर जळाले!"; छावणीत घराला भीषण आग, डेकोरेशनच्या कापडामुळे मोठा भडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 20:10 IST2026-03-09T20:09:37+5:302026-03-09T20:10:26+5:30
छ. संभाजीनगरात आगीचे तांडव! छावणीतील घराचा तिसरा मजला भस्मसात, जीवितहानी टळली

"डोळ्यादेखत घर जळाले!"; छावणीत घराला भीषण आग, डेकोरेशनच्या कापडामुळे मोठा भडका
छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी परिसरात आज दुपारच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. घराच्या तिसऱ्या मजल्यावर साठवून ठेवलेल्या डेकोरेशनच्या साहित्याने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डेकोरेशनच्या साहित्यामुळे आगीचा भडका
संबंधित घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे ज्वलनशील साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर काही क्षणांतच या साहित्याने पेट घेतल्याने आगीचे लोट घराबाहेर पडताना दिसत होते. आगीचे भीषण स्वरूप पाहून परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अग्निशामक दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, या आगीत घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.