छ. संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात छावासह मराठा संघटनांचे आंदोलन; क्रांतीचौक परिसर दणाणला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:05 IST2025-07-21T18:58:53+5:302025-07-21T19:05:35+5:30
सूरज चव्हाणच्या प्रतिमेला आसूडाचे फटके आणि जोडे

छ. संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात छावासह मराठा संघटनांचे आंदोलन; क्रांतीचौक परिसर दणाणला
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना लातुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद साेमवारी शहरात उमटले. छावासह विविध मराठा संघटनांनी क्रांतीचाैकात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेला आसूडाचे फटके मारत पत्त्यांची उधळण केली.
लातूर येथे छावाचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावासह विविध मराठा संघटना आणि शेतकरी संघटनांनी सोमवारी सकाळी क्रांतीचौकात जोरदार आंदोलन केले. सूरज चव्हाणला अटक करा, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय, अजीत दादा हाय, हाय, सुनील तटकरे हाय, हाय, सूरज चव्हाण मूर्दाबाद, अशा घोषणा देत आंदोलकांनी सोमवारी क्रांतीचौक दणाणून सोडला.यावेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला आसूडाचे फटके मारले. तर काहींनी जोडे मारले.
अनेकांनी सोबत आणलेल्या पत्त्याचा कॅट उधळत जोरदार घोषणा दिल्या. तर अचानक काही आंदोलकांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी त्यांना उचलून बाजूला नेल्याने वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनातप्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, आप्पासाहेब कुढेकर,सुरेश वाकडे पाटील, सुनील कोटकर, आत्माराम शिंदे, संतोष काळे, विजय काकडे, अशोक मोरे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, नितीन कदम, रमेश गायकवाड, राजीव थिटे, लक्ष्मण नवले,नीलेश डव्हळे, ज्ञानेश्वर गायकवाड, कल्याण शिंदे, शैलेश भिसे,रेखा वाहटुळे, दिपाली बोरसे, दिव्या पवार , बळीराजा शेतकरी संघटनेचे निवृत्ती डक आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
बॅनर फाडले...
उस्मानपुरा रस्त्यावरील एका इमारतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्याचे बॅनर लावण्यात होते. हे बॅनर कार्यकर्त्यांनी फाडून राष्ट्र्रवादीच्या नेत्यांचा निषेध नोंदविला.