नोकरी दिलीच नाही, दुसऱ्याचेच प्लॉट नावे केले; शाळा संचालिकेचा ३० लाखांचा 'डबल' घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:12 IST2026-03-25T19:11:58+5:302026-03-25T19:12:37+5:30
कै. बाळासाहेब पाटील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या संचालिकेवर गुन्हा दाखल

नोकरी दिलीच नाही, दुसऱ्याचेच प्लॉट नावे केले; शाळा संचालिकेचा ३० लाखांचा 'डबल' घोटाळा
छत्रपती संभाजीनगर : आधी बहीण-भावाचे नाते प्रस्थापित करून उसने घेतलेले लाखो रुपये थकले. ते परत करणे शक्य नसल्याने शिक्षण संस्थेच्या संचालिकेने कुटुंबाला त्यांच्या मुलाला थकीत पैशांच्या बदल्यात कला शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. असे करत महिलेने विष्णू गबाजी शहाणे (रा. हरिज्योती पार्क) यांना ३० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी मंगळवारी ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. बाळासाहेब पाटील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या संचालिका संगीता बाळासाहेब आव्हाळे (रा. सातारा परिसर) यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निवृत्त झालेल्या शहाणे यांची २०१० मध्ये नोकरीत असताना आव्हाळेसोबत ओळख झाली. २०१२ मध्ये आव्हाळेने संस्थेच्या अडीअडचणी सांगून शहाणेंकडून १० लाख ५ हजार रुपये उसने घेतले. काही दिवसांनी शहाणेंनी पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा पैसे परत करण्यापेक्षा त्यांच्या मुलाला शाळेत कला शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष आव्हाळेने दाखविले. त्यासाठी अधिक २० लाखांची मागणी केली. शहाणे यांनी २० लाख रुपये दिले. त्यानंतर आव्हाळेने शहाणे यांच्या मुलाच्या नावे नियुक्तीपत्र देऊन अनुदान मिळाल्यानंतर रुजू करण्याचे आश्वासन दिले.
इतरांकडून पैसे घेऊन दिले
असा हा ३० लाखांचा व्यवहार झालेला असताना आव्हाळेने पुन्हा शाळा संकटात असल्याचे सांगून पैसे मागितले. तेव्हा शहाणे यांनी पैठणच्या शेख यांच्यासाठी साडेपाच लाख, गाडे यांच्यासाठी २ लाख, दीपक गायकवाडला शिपायाच्या नोकरीसाठी साडेचार लाख, चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी नांदेडच्या पाटीलकडून ५० हजार रुपये घेऊन आव्हाळेला दिले. त्यांना आव्हाळेने नियुक्तीपत्र देऊन रुजू करून घेतले. मात्र, पगारच मिळत नसल्याने ते नोकरी सोडून गेले. त्याशिवाय शहाणे यांनी प्रशांत सातपुते, कालिदास जायभाये, सदानंद डाके, बाळासाहेब भुमरे, अमरवीर व गजानन सातपुते व वाल्मीक पाटील यांच्याकडून एकूण ७ लाख रुपये घेऊन आव्हाळेला दिले.
हपापाचा माल गपापा
पैसे परत करण्याचे आश्वासन देत आव्हाळेने शहाणे यांना मुकुंदवाडीतील ६०० चौरस फुटांचे ८ प्लॉट त्यांच्या नावे करून देण्याचे आमिष दाखविले. त्याची नोटरीदेखील करून दिली. मात्र, ते सर्व प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे उघडकीस आले. वारंवार मागूनही पैसे परत न मिळाल्याने शहाणे यांनी सातारा पोलिसांकडे तक्रार केली. सहायक निरीक्षक शैलेश देशमुख तपास करीत आहेत.