मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:52 IST2026-03-27T19:51:17+5:302026-03-27T19:52:05+5:30
जुना बाजार परिसरात चार ते पाच जणांकडून पाठलाग, पोलिसासमोर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉडने वार

मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर : मनपा निवडणुकीपासून एमआयएमच्या आजी-माजी नगरसेवकांच्या वादाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळाले. माजी नगरसेवक रफत यार खान यांच्यावर गुरुवारी दुपारी जुना बाजार परिसरात चार ते पाच जणांनी मिळून लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला केला.
माजी नगरसेवक रफत यार खान यांनी नुकताच मालेगावच्या इस्लाम पार्टीत प्रवेश केला आहे. दरम्यान, त्यांचे मनपा निवडणुकीपासून एमआयएमच्या काही आजी नगरसेवकासोबत वाद सुरू आहेत. यापूर्वी त्यांच्यात दोन वेळेस हाणामारीच्या घटना घडल्या. त्यातून त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले. २६ मार्चला रफत यार खान दुपारी ४ वाजता जुना बाजार भागात गेले होते. सिटीचौक पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी स्लिप झाली अन् पाठलाग करणाऱ्यानी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर राजकीय तणाव होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घाटी रुग्णालयात धाव घेत कडेकोट बंदोबस्त तैनात केला. घटनेत रफत यांच्या डोक्याला जवळपास १० टाके पडल्याचे सांगण्यात आले.
राजकीय वादाची पार्श्वभूमी
२० मार्चला सिल्लेखाना चौकात रफत खान यांच्यावर फायटरने वार करण्यात आला होता. या प्रकरणी नुकताच मंगळवारी रात्री क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारचा हल्लादेखील जुन्या वादातून झालेला असून पूर्वनियोजित हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी रात्री उशिरा सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.