छत्रपती संभाजीनगरचा रील स्टार अरुण तुपेची अकाली एक्झिट, चाहत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:44 IST2026-03-10T12:43:45+5:302026-03-10T12:44:05+5:30
राजकीय आणि सामाजिक रीलचा बादशहा हरपला, छत्रपती संभाजीनगरात हळहळ

छत्रपती संभाजीनगरचा रील स्टार अरुण तुपेची अकाली एक्झिट, चाहत्यांना धक्का
छत्रपती संभाजीनगर: आपल्या अनोख्या अभिनय शैलीने आणि विनोदी ढंगाने सामाजिक प्रश्न मांडणारा शहरातील उदयोन्मुख रील स्टार अरुण तुपे याचा मंगळवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. बालाजी नगर येथील राहत्या घरात तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घरात आढळला अत्यवस्थ
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण आज सकाळी त्याच्या घरातील खोलीत नातेवाईकांना अत्यंत गंभीर (अत्यवस्थ) अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सध्या त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालय (घाटी) येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा हरपला
अरुण तुपे हा सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय होता. भावनिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्याने तयार केलेले रील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असत. त्याच्या जवळच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला 'फिट्स'चा (अपस्मार) त्रास होता. मात्र, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका उमद्या कलाकाराच्या अशा अकाली जाण्याने सोशल मीडियावरील त्याचे हजारो चाहते आणि रील स्टार्सकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.