मनपाचे पथक जाताच शहागंजमध्ये पुन्हा अतिक्रमणांचा विळखा; १०० हून अधिक हातगाड्या 'जैसे थे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:58 IST2026-02-27T12:56:57+5:302026-02-27T12:58:16+5:30
सकाळी मनपाचा धडाका, दुपारी पुन्हा हातगाड्यांचा राडा; शहागंजमध्ये परिस्थिती 'जैसे थे'

मनपाचे पथक जाताच शहागंजमध्ये पुन्हा अतिक्रमणांचा विळखा; १०० हून अधिक हातगाड्या 'जैसे थे'
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरूवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून अचानक शहागंज चमन भागात कारवाईला सुरूवात केली. त्यामुळे या भागातील हातगाडी चालकांनी परिसरातील विविध गल्लीबोळांत धूम ठोकली. महापालिकेच्या गळाला हातगाडी चालक लागलेच नाहीत. चमनच्या आसपास आणि क्लॉक टॉवर येथील चप्पल गल्लीतील ३० पेक्षा अधिक शेड मनपाने पाडल्या. या कारवाईमुळे हातगाडी चालक, व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
बुधवारी सायंकाळी शहागंज चमन येथे ४ हातगाडी चालकांनी एका गर्भवती महिलेसह तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही करण्यात आली. या घटनेनंतर येथील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला. महापालिकेतील सत्ताधारी शिंदेसेनेने या प्रकरणात उडी घेतली. अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी रात्रीच आयुक्तांना केली.
सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटाव विभागाला बोलावण्यात आले. या विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह वॉर्ड अधिकारी, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद आदींनी ११:३० वाजता कारवाईला सुरुवात केली. मनपाचे पथक पाहताच फळ विक्रेत्यांनी तर अक्षरश: मिळेल त्या रस्त्याने धूम ठोकली. १०० पेक्षा अधिक हातगाडी चालकांनी पळ काढला. त्यानंतर मनपाच्या पथकाने चमनसमोरील एका फळ विक्रेत्यावर कारवाई केली. त्याचे बरेच सामान रस्त्यावर आले होते. चप्पल गल्लीतील व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर शेड उभारल्या होत्या. ३० पेक्षा अधिक शेड मनपाने काढल्या.
एका तासानंतर हातगाड्या
महापालिकेचे पथक १:३० च्या सुमारास शहागंज येथून बाहेर पडले. त्यानंतर २:३० वाजता शहागंज मशीद रोड, हिंदी भवन रोड, किराणा चावडीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी हातगाडी चालकांनी पुन्हा अतिक्रमण केले. दररोज ज्या पद्धतीने बेशिस्त हातगाड्या लावण्यात येतात त्यामध्ये आज थोडीशी शिस्त दिसत होती.
रस्ता मोकळा ठेवावा लागेल
शहागंज चमन परिसरातील सर्वच रस्ते २४ तास मोकळे असायला हवेत. मुख्य रस्त्यावर हातगाडी चालक असतील किंवा दुकानांच्या समोर असलेले अतिक्रमण निश्चित काढले जाईल. व्यापाऱ्यांनीही थोडी शिस्त पाळायला हवी.
संतोष वाहुळे, अतिक्रमण सनियंत्रण अधिकारी, मनपा
दोन वर्षांपूर्वीही कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दोन वर्षांपूर्वी शहागंज चमन भागात मोठी कारवाई केली होती. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून मनपाचे माजी सैनिकही काही दिवस या भागात तैनात करण्यात आले होते.