पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:59 IST2026-03-10T13:46:39+5:302026-03-10T13:59:24+5:30

यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar: Elections for 9 Panchayat Samiti Chairpersons Today; Uddhav Sena Plays Kingmaker | पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता

पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ९ पंचायत समितींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.१०) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जो पक्ष उपाध्यक्षपद देईल, त्या पक्षासोबत जाण्याची तयारी उद्धवसेनेने केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचायत समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आज ठरणार
मागील महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हा परिषदेत ९ तर पंचायत समिती निवडणुकीत ११ सदस्य निवडून आले आहेत. उद्या १० मार्चला पंचायत समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे उद्धवसेनेने आपल्या उमेदवाराला उपाध्यक्षपद देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये उद्धवसेनेचे ४, गंगापूरमध्ये २, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री पंचायत समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य आहे.

...तर शिंदेसेनेसोबत जाऊ शकते उद्धवसेना
संभाजीनगर पं.स. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत शिंदेसेना आहे. उद्धवसेनेच्या चार सदस्यांना सोबत घेऊन शिंदेसेना सभापतिपद मिळविण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पैठण पंचायत समिती निर्विवाद शिंदेसेनेकडे
पैठण पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. या पंचायत समितीचे सभापती व उपसभापतिपदी शिंदेसेनेचा उमेदवार बिनविरोध विजयी होऊ शकतो.

पंचायत समितीवर कोणाचा झेंडा?
पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केला. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
ग्रामविकास विभागाने पत्र पाठवून २० मार्चपूर्वी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पं. स.चे सभापती आणि उपसभापती निवडण्याचे निर्देश दिले आहेत.
सभापती, उपसभापती निवडीसाठी दुपारी २:०० वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. सभेच्या दोन तास आधी सभापती, उपसभापती पदासाठी नामांकन स्वीकारण्यात येतील. सभेसाठी गणपूर्ती होण्यासाठी एक तृतीयांश सभासद बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असेल. ९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याने सभापती, उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम ठरला. निश्चित केलेल्या आरक्षणानुसार ही निवडणूक होणार आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar: Elections for 9 Panchayat Samiti Chairpersons Today; Uddhav Sena Plays Kingmaker