ऊसतोडीच्या वादातून शेतकऱ्याचे कांचनवाडीतून अपहरण; ४० हजार, बाँड लिहून दिल्यावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:45 IST2026-03-20T16:42:43+5:302026-03-20T16:45:02+5:30

भावाने ऑनलाईन ४० हजार रुपये व बॉण्ड पाठविल्यानंतर सुटका; सातारा पोलिस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime: Farmer Kidnapped from Kanchanwadi Over Sugarcane Payment Dispute; Released After Ransom Paid Online | ऊसतोडीच्या वादातून शेतकऱ्याचे कांचनवाडीतून अपहरण; ४० हजार, बाँड लिहून दिल्यावर सुटका

ऊसतोडीच्या वादातून शेतकऱ्याचे कांचनवाडीतून अपहरण; ४० हजार, बाँड लिहून दिल्यावर सुटका

छत्रपती संभाजीनगर : ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून सहाजणांनी कांचनवाडीतून शेतकरी विलास गोविंद चव्हाण (वय ३५, रा. गिरनेर तांडा) यांचे अपहरण केले. २४ तासांनंतर विलास यांच्या भावाने अपहरणकर्त्यांना ४० हजार रुपये व उर्वरित पैसे देण्याचा करारनामा करून दिल्यानंतर विलास यांची सुटका करण्यात आली.

त्यांच्यावर चाकूने वार देखील करण्यात आले. याप्रकरणी १७ मार्च रोजी अचिन जयंत चव्हाण, सचिन चव्हाण (रा. भासूनाई तांडा, ता. अंबड) या दोघांसह अन्य सहा जणांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विलास यांचा भाऊ विकास चव्हाण यांचा आरोपी सचिन व अचिनसोबत ऊसतोडीचा व्यवहार आहे. १५ मार्चला रात्री नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे वळदगाव परिसरात मिरची विकून ते दुचाकीने कांचनवाडीकडे जात होते. रस्त्यात अचानक दुचाकीस्वारांनी त्यांना अडविले. त्यानंतर मागून आलेल्या चारचाकीतून चौघांनी उतरून त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अपहरण केले. विलास यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकाने त्यांच्या हातावर चाकूने वार केले. त्यानंतर झाल्टा फाटा परिसरात नेत सचिन व अचिनने त्यांना 'आमचे पैसे का देत नाही' असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर अंबड तालुक्यातील भासूनाईक तांड्यावर नेत एका शेडमध्ये डांबले.

१६ मार्चला सकाळी सचिनने विलास यांचा भाऊ विकासशी संपर्क साधून पैसे मागितले. विकासने तत्काळ त्यांना ऑनलाईन ४० हजार रुपये पाठविले. शिवाय, उर्वरित पैसे देण्यासाठी ५०० रुपयांचा करारनामा करून पाठविला. ठरलेल्या तारखेपर्यंत पैसे न दिल्यास खुनाची धमकी देत विलास यांची सुटका केली. शहरात परतल्यानंतर विलास यांनी रुग्णालयात उपचार घेऊन सातारा पोलिसांकडे तक्रार केली. उपनिरीक्षक गाेविंद एकिलवाले तपास करीत आहेत.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Crime: Farmer Kidnapped from Kanchanwadi Over Sugarcane Payment Dispute; Released After Ransom Paid Online