छ. संभाजीनगरला वाढीव २०० एमएलडी पाण्याची प्रतीक्षाच, कामे पूर्ण करण्यासाठी २० दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:33 IST2026-02-13T19:30:51+5:302026-02-13T19:33:38+5:30
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतची सर्व छोटी कामे संपविण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश

छ. संभाजीनगरला वाढीव २०० एमएलडी पाण्याची प्रतीक्षाच, कामे पूर्ण करण्यासाठी २० दिवसांची मुदत
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळालेच पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पुढील २० दिवसांत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतची सर्व कामे संपवा, असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीव्हीपीआर, महावीर या कंपन्यांना दिल्या.
नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी धरणात जॅकवेल (उद्भव विहीर) तयार केली आहे. धरणात सुमारे २७ मीटर खोल जॅकवेलचे बांधले आहे. जॅकवेलच्या आत एखादा व्यक्ती गेल्यास त्याला श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता भासते. जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून, दोन दिवसांपूर्वी सायफन पद्धतीने त्यात पाणी घेण्यात आले. या पाण्याद्वारे साफसफाई करण्यात आली. तळाला अजून मोठ्या प्रमाणात सिमेंटचा गाळ साचलेला आहे. एक छोटे पोकलेन जॅकवेलमध्ये उतरवून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जायकवाडीपर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्य जलवाहिनीचे कामही पूर्ण झाले.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची बैठक दोन दिवसांपूर्वीच पार पडली. या बैठकीत जॅकवेलच्या स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आला. सर्व स्थिती जाणून घेतल्यावर विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आणि कंत्राटदार कंपनीला जॅकवेलच्या स्वच्छतेसाठी दहा दिवसांची डेडलाइन दिली. पाणीपुरवठा योजनेची अन्य कामे पूर्ण करण्यासाठी आणखीन दहा दिवस दिले आहेत. वीस दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याची टेस्टिंग घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. टेस्टिंग घेतल्यानंतर पुढील काही दिवसांत शहरात पाणी आणण्याचा विचार आहे. १ मार्चपूर्वी शहरात पाणी येईल का, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.