मेसचे पैसे थकले, गरुडझेप अकॅडमीच्या संचालकाने विद्यार्थ्याला नाकातून रक्त वाहेपर्यंत मारले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:25 IST2026-03-02T13:20:07+5:302026-03-02T13:25:01+5:30

गरुडझेप अकॅडमीतील अमानुष मारहाण प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ; संचालक नीलेश सोनवणेसह चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: Atrocity Case Filed Against Garudjhep Academy Director Nilesh Sonawane for Assaulting Student for food money | मेसचे पैसे थकले, गरुडझेप अकॅडमीच्या संचालकाने विद्यार्थ्याला नाकातून रक्त वाहेपर्यंत मारले!

मेसचे पैसे थकले, गरुडझेप अकॅडमीच्या संचालकाने विद्यार्थ्याला नाकातून रक्त वाहेपर्यंत मारले!

छत्रपती संभाजीनगर : गरुडझेप अकॅडमीत शिकत असलेल्या मुलाच्या मेसचे पैसे थकल्यामुळे त्यास तीन शिक्षकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण केली. याविषयी तक्रार करण्यासाठी मुलाचे पालक संचालक नीलेश सोनवणेकडे गेले असता त्यांनाही त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी घडला. याप्रकरणी चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह इतर कलमांन्वये दौलताबाद पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदविला.

आरोपींमध्ये गरुडझेप अकॅडमीचा संचालक नीलेश सोनवणे, शिक्षक स्वप्नील चव्हाण, अभिजित उर्फ बोल्ड आणि पठाण या चौघांचा समावेश आहे. नाशिक येथील पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा १७ वर्षांचा मुलगा यश (नाव बदललेले) हा नाशिक येथील गरुडझेपच्या अकॅडमीत निवासी शिक्षण घेत आहे. तो १२वी सायन्समध्ये शिकतो. गरुडझेपअंतर्गत १२वी बोर्डाच्या परीक्षेचे फुलंब्री येथील जि. प. शाळेत केंद्र होते. त्यासाठी नाशिकच्या १०० ते १५० मुलांची शरणापूर येथील गरुडझेपच्या अकॅडमीत राहण्याची व्यवस्था होती. परीक्षेसाठी शरणापूर येथून विद्यार्थ्यांची ने-आण केली गेली. यशच्या पालकांनी २०२३-२६ या काळासाठी २ लाख ७० हजारांपैकी २.१५ लाख फी भरलेली आहे. ते मेसचे साडेचार हजार रु. नियमितपणे देत होते. फेब्रुवारी महिन्याचे मेसचे पैसे बाकी होते. मात्र, या किरकोळ थकबाकीसाठी शिक्षक स्वप्नील चव्हाण याने यशला दि. १५ फेब्रुवारीपासून मानसिक त्रास देणे सुरू केले. दि. २३ फेब्रुवारीला तर क्रूरतेचा कळस गाठत नाश्ता आणि दुपारच्या जेवणापासून वंचित ठेवून दिवसभर उपाशी ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हातावर सही घेऊन दिले जेवण
भूक लागल्यामुळे यश दि. २३ फेब्रुवारीच्या रात्री मेसमध्ये जेवण्यासाठी गेला, तेव्हा त्यास फीसबाबत विचारणा केली. त्याच्या हातावर सही घेऊन जेवण दिले. मात्र, तेवढ्या जेवणात भूक शमली नसल्यामुळे त्याच्यासह चार मित्रांनी बाहेरून जेवण मागविले. तेव्हा शिक्षक पठाणने जेवणासह त्यांना पकडले. ‘फी भरायची लायकी नाही आणि बाहेरून जेवण मागविता का?’ असे म्हणत तीन शिक्षकांनी चौघांना शिवीगाळ करून स्पोर्ट्स ऑफिसमध्ये नेले. तिथे अमानुष मारहाण केली. त्यात यशच्या नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

पालकांना संचालकाची जातीवाचक शिवीगाळ
हा प्रकार यशने पालकाला सांगितला. तेव्हा त्यांनी शरणापूर गाठले. मुलाची अवस्था पाहून पालक घाबरून संचालक सोनवणेला भेटायला गेले. तेव्हा सोनवणे याने फी भरली नाही तर अशीच मारहाण होणार, असे सांगितले. संचालकासह शिक्षकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‘भिकारड्यांनो तुमच्या औकातीत राहा, मला जाब विचारायला आला का?, जिवे मारून टाकीन, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही’ अशी धमकी देत अंगावर धावून आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : फीस न भरने पर एकेडमी डायरेक्टर ने छात्र को पीटा; जातिसूचक गाली देने का आरोप।

Web Summary : गरुड़झेप एकेडमी में मेस की फीस न भरने पर एक छात्र की बेरहमी से पिटाई की गई। निर्देशक पर शिकायत करने पर माता-पिता के खिलाफ जातिसूचक गालियां देने का आरोप है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Academy Director Assaults Student Over Unpaid Fees; Casteist Slurs Alleged.

Web Summary : A student was brutally beaten for unpaid mess fees at Garudjhep Academy. The director allegedly used casteist slurs against the parents when they complained about the assault. Police have registered a case.