शेंद्रा ते बिडकीन नवीन सहापदरी मार्गाने 'इंडस्ट्रियल कनेक्ट' वाढणार; अर्थसंकल्पात ७४५ कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:55 IST2026-03-07T12:55:02+5:302026-03-07T12:55:27+5:30
७० किमीच्या नवीन ग्रीनफील्ड रस्त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

शेंद्रा ते बिडकीन नवीन सहापदरी मार्गाने 'इंडस्ट्रियल कनेक्ट' वाढणार; अर्थसंकल्पात ७४५ कोटींची तरतूद
छत्रपती संभाजीनगर : शहरालगत टप्पा क्र. १ अंतर्गत शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन ३५.८० कि.मी. आणि टप्पा क्र. २ मध्ये बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव ३४.८० कि.मी. या नवीन ग्रीनफील्ड रस्त्याचे बांधकाम औद्याेगिक क्षेत्र विकासाच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांत ७०.६० कि.मी.पर्यंत दोन्ही बाजूंनी भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यासाठी ३१५ कोटी, तर दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनासाठी ४३० कोटी, असा ७४५ कोटींचा निधी करून देण्यास शासनाने तत्त्वतः मान्यता दिल्याचे ५ डिसेंबर २०२५ ला एका अध्यादेशान्वये जाहीर केल्यानंतर आज शुक्रवारी ६ मार्चला अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली.
भाग-१ च्या भूसंपादनासाठी ३१५ कोटी आणि भाग-२ च्या भूसंपादनासाठी ४३० कोटी निधी उपलब्ध होणार आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकांकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यातून निधी दिला जाईल. एमएसआयडीसीकडे हा प्रकल्प देण्यासाठी शासनाच्या हालचाली सुरू आहेत. ग्रीनफील्ड रस्त्याच्या भाग-१ मध्ये छत्रपती संभाजीनगर डीएमआयसीअंतर्गत करमाड ते बिडकीन सहापदरी रस्ता करणे. ३४.८० किमीचा हा रस्ता असेल.
भाग-२ मध्ये बिडकीन ते ढोरेगाव (पुणे-नगर रस्ता) सहापदरी करणे. ३५.८० किमी हा रस्ता असेल. या दोन्ही रस्त्यांच्या अलायन्मेंटसाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
इंडस्ट्रिअल कनेक्टिव्हिटी वाढणार
शहरालगत वाळूज ३,२४५ एकरांमध्ये, तर २,२५५ एकरांमध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. डीएमआयसीमध्ये १० हजार एकरांवर एमआयटीएल निर्माण होत आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये बड्या कंपन्यांची कामे सुरू झाली आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये अवजड वाहतुकीचे प्रमाण भविष्यात वाढणार आहे. भविष्यातील औद्योगिक विकास, वाहतूक समोर ठेवून शेंद्रा ते बिडकीन, बिडकीने ते ढोरेगाव या ग्रीनफील्ड रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.