गुड न्यूज! अंकाई-छ. संभाजीनगर दुहेरीकरणाचे काम 'अब तक ५० टक्के'; पाहा कधी होणार काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:38 IST2026-03-25T18:37:38+5:302026-03-25T18:38:46+5:30
रेल्वे दुहेरीकरण अपडेट: अंकाई ते संभाजीनगर मार्गावर विद्युतीकरणाचे कामही जोरात; प्रवासाचा वेळ वाचणार

गुड न्यूज! अंकाई-छ. संभाजीनगर दुहेरीकरणाचे काम 'अब तक ५० टक्के'; पाहा कधी होणार काम?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - अंकाई रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दुहेरीकरणामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर २०२१ मध्ये छत्रपती संभाजीनगर - अंकाई (मनमाड) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. सर्वेक्षणानंतर दुहेरीकरणाच्या कामालाही मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया होऊन नोव्हेंबर २०२४ मध्ये दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. कामाची गती वाढण्यासाठी अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांत काम सुरू आहे. यासाठी अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा ४३८ कोटी आणि ४३४ कोटी रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या.
सध्या कुठे काम सुरू?
नगरसोल - तारुर - रोटेगाव आणि लासूर - पोटूळ - दौलताबाददरम्यान सध्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचेही काम केले जात आहे. त्यासाठी विद्युतीकरणाचे पोलही उभे केले जात आहेत.
दुहेरीकरणामुळे काय बदलणार?
- रेल्वेंची संख्या वाढणार.
- प्रवासाचा वेळ कमी होणार.
- मालवाहतुकीला चालना.
- वेळापत्रक अधिक अचूक.
- औद्योगिक विकासाला गती.
मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत
- दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर- मुंबई प्रवास अधिक वेगवान व सुलभ.
- दुहेरी ट्रॅकमुळे नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
- प्रवासाचा वेळ कमी, क्रॉसिंग टळल्याने मुंबई गाठणे होणार जलद.
- मुंबईमार्गे देशातील इतर शहरांशी जोडणी अधिक सुलभ होईल.
- मुंबईशी वाढलेली कनेक्टिव्हिटी म्हणजे नोकरी-व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.
- शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास सुलभ होईल.
- मुंबईतील उपचारांसाठी जाणाऱ्यांच्या वेळेची बचत होईल.