गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:41 IST2026-02-26T13:39:38+5:302026-02-26T13:41:42+5:30
मुजोर फळविक्रेत्यांची गर्भवती महिलेसह तरुणाला धक्काबुक्की, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर
छत्रपती संभाजीनगर: शहरातील शहागंज चमन भागात एका गर्भवती महिलेला आणि तरुणाला फळविक्रेत्यांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर प्रशासन तातडीने 'ॲक्शन मोड'वर आले असून, गुरुवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील बेकायदेशीर हातगाड्यांवर मोठा धडाका लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी इम्रानसह सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना आणि मुजोरी
रमजाननिमित्त शहागंज परिसरात फळविक्रेत्यांची गर्दी वाढली असून, रस्त्याच्या मध्यभागापर्यंत हातगाड्या लावल्या जात आहेत. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका गर्भवती महिलेला विक्रेत्यांनी धक्काबुक्की केली आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार शहागंज पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती.
प्रशासनाचा 'बुलडोझर' धावला
माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा आयुक्तांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ७ जणांना बेड्या ठोकल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात शहागंज चमन परिसरातील सर्व अतिक्रमित हातगाड्या हटवल्या. या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून गुदमरलेल्या या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
नागरिकांची मागणी मान्य
शहागंज भागातून चारचाकी तर सोडाच, साधी दुचाकी नेणेही कठीण झाले होते. "काही हातगाडीधारकांची मुजोरी वाढली असून ते थेट नागरिकांवर हात उचलत आहेत," असा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला होता. मनपाच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशीच शिस्त कायम राखण्याची मागणी आता होत आहे. यापुढे देखील या वर्दळीच्या भागात अतिक्रमण विभाग लक्ष ठेवून असेल असे यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.