खड्डा खोदून वडिलांना पुरले; पैठणमध्ये मुलाचे हादरवणारे कृत्य, आईलाही दिली जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:07 IST2025-11-23T16:02:30+5:302025-11-23T16:07:09+5:30
पैठणमध्ये किरकोळ कारणावरुन मुलाने वडिलांची हत्या करुन त्यांचा मृतदेह घरातच पुरला.

खड्डा खोदून वडिलांना पुरले; पैठणमध्ये मुलाचे हादरवणारे कृत्य, आईलाही दिली जीवे मारण्याची धमकी
Paithan Crime News : किरकोळ कारणावरून एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला संपवून त्यांचा मृतदेह घरातच पुरला. उग्र वास येत असल्याने आठ दिवसांनंतर हे प्रकरण शनिवारी उघडकीस आले. ही घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बु. येथे घडली. कल्याण काळे (६५) असे मयताचे नाव आहे, तर राम (३८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
कडेठाण बुद्रुक येथे कल्याण काळे हे पत्नी व दोन मुलांसह राहत. त्यांची मुले राम-लक्ष्मण अविवाहित आहेत. रामशी कल्याण यांचे नेहमी वाद होत. १३ रोजी दोघांमध्ये असाच वाद झाला. तीक्ष्ण हत्याराने वार करून रामने वडिलांना ठार मारले. ही घटना त्याने भोळसर आईसमोर केली होती. मात्र, त्याने आईला जिवे मारण्याची धमकी देत गप्प राहण्यास सांगितले. मृतदेह घरात खड्डा खोदून पुरला.
आठ दिवसांनंतर अत्यंत उग्र वास सुटल्यानंतर ही बाब कल्याण यांच्या पत्नीने दिराला सांगितली. त्यांनी सरपंच संभाजी तवार यांना सांगितले. तवार यांनी पाचोड पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच सपोनि. सचिन पंडित, पोउनि. राम बाराहाते, पोउनि. महादेव नाईकवाडे तसेच जमादार रवी आंबेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राम काळे याला अटक केली आहे. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले