अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

By बापू सोळुंके | Published: November 6, 2023 07:22 PM2023-11-06T19:22:03+5:302023-11-06T19:28:12+5:30

अंतरवाली सराटीतील लाठीहल्ला घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा

Chhagan Bhujabal's allegation of stone pelting on police at Antarwali Sarati is a conspiracy: Manoj Jarange Patil | अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर: अंतरवाली सराटी येथे ज्यांनी पोलिसांचा मार खाल्ला त्या जनतेची बाजूने बोलायचे नाही आणि आंदोलकांनी पोलिसांवर आधी दगडफेक केल्याची मंत्री छगन भुजबळांची भाषा हा एक षडयंत्राचा भाग आहे, असा पलटवार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच खरे काय हे जाणून घेण्यासाठी हा लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांवर सप्टेंबर महिन्यात  पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा कट कोणी घडवून आणला, कोणी फोन केले, मंत्री, एस.पी असो किंवा आय. जी. यांची पंधरा दिवसा आधीची भूमिकेचीही उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करीत आहोत. या घटनेचे दूध, का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या,असे जाहीर आवाहनही आपण मुख्यमंत्र्यांना करीत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, ओबीसीची लोकसंख्या ५४ टक्के आहे, यामुळेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी भूजबळांनी केली. शिवाय मराठ्यांना ओबीसीचे सरसकट आरक्षण देण्यास भुजबळ यांचा विरोध असल्याची भूमिका  भूजबळांनी घेतली आहे, याकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना, तुम्ही मंत्री आहात तर मग जातनिहाय जनगणना करा, तुम्हाला कोणी रोखले असा सवाल त्यांनी भूजबळांना केला. ज्यांनी माझ्या माय, बहिणींवर अमानुष लाठ्या चालवल्या, गोळीबार केला, त्या जालन्याच्या एस.पी.ला सस्पेंड न करता त्याला केवळ सक्तीच्या रजेवर पाठविले.

हिंसाचाराचे समर्थन नाही.. पण उपोषण करणाऱ्यांची धरपकड योग्य नाही
बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करीत नाही. पण पोलिसांनी आता मराठा आरक्षणासाठी साखळी, बेमुदत उपोषण आणि अन्य आंदोलन करणाऱ्या तरूणांनाच टार्गेट करीत त्यांची धरपकड सुरू केली. अशा निष्पाप आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी  सरकारकडे मागणी आहे.

Web Title: Chhagan Bhujabal's allegation of stone pelting on police at Antarwali Sarati is a conspiracy: Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.