छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:59 IST2026-01-23T11:58:58+5:302026-01-23T11:59:55+5:30

दोन ते तीन महिन्यांपासून वाळुजमध्ये वास्तव्य, तरी एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ

Ch. Sambhajinagar a center for trafficking of Bangladeshi girls? Two girls found again, reason unclear | छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट

छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशातील दोन वीस वर्षांच्या मुलींची पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे शहरात तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघींची गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना शहरात का आणण्यात आले, याचा गुन्ह्यात उल्लेख नसल्याने त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यांना अवैधरीत्या हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी हॉटेलचालक आकाश नाना त्रिभुवन (वय २९, रा. आंबेडकरनगर) याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड बायपासवरील व्हाईट हाऊस लॉजमध्ये दोन बांगलादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती शहर पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजेश मयेकर, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सहकाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्यात बांगलादेशी वीस वर्षांच्या दोन मुली आढळल्या. महिला अधिकाऱ्यांनी दोघींना ताब्यात घेतले.

आम्ही नदीमार्गे आलो...
दोन्ही मुलींच्या बांगलादेशमधील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. चौकशीतील त्यांच्या दाव्यानुसार, चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांनी नदीमार्गेे देशाची सीमा ओलांडून, लष्कराच्या गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केला. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी वाळुजमधील हॉटेलमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांपूर्वीच तस्करांनी त्यांना गांधेली फाटा परिसरातील व्हॉईट हाऊस लाॅजिंगमध्ये नेले होते. मात्र, त्यांना देशात, शहरात आणण्याचा उद्देश काय, काेणी आणले, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांची पोलिस चौकशी करत आहेत.

बांगलादेशींच्या तस्करीसाठी शहरात कायमच केंद्रस्थानी
-मे २०२५ मध्ये झाल्टा फाटा परिसरात बांगलादेशी मुलींना देहविक्रीसाठी तस्करी करून आणण्यात आले होते. यात हॉटेलचालक अभिजित बाळासाहेब जाधव (मूळ रा. घनसावंगी) याला अटक झाली होती.
-जानेवारी २०२४ मध्ये कोलकाता, पुणे मार्गे शहरात १६ वर्षीय बांगलादेशी मुलीची तस्करी करण्यात आली होती.
-विधान परिषदेच्या उपसभापती यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र बनल्याच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती.

एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ कसे ?
अवैधरीत्या शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांबाबत माहिती मिळवून कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यत्वे दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) असते. एटीएसकडून मात्र केवळ व्हीआयपींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच हॉटेल, लॉजिंगची तपासणी करून याबाबत माहिती मिळवली जाते. शिवाय, दोन मुली वाळुजच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या, तरीही वाळुज, एमआयडीसी वाळुज पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर: बांग्लादेशी लड़कियों के तस्करी का अड्डा; दो और मिलीं।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में दो बांग्लादेशी महिलाओं की तस्करी। पुलिस जांच कर रही है कि उन्हें कैसे और क्यों लाया गया। एक होटल व्यवसायी को अवैध रूप से शरण देने के आरोप में गिरफ्तार किया गया। शहर में ऐसे मामले सामने आए हैं, जिससे तस्करी नेटवर्क को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Trafficking hub for Bangladeshi girls; two more found.

Web Summary : Two Bangladeshi women were trafficked to Chhatrapati Sambhajinagar. Police investigate how and why they were brought there. A hotelier is booked for harboring them illegally. The city has seen similar cases, raising concerns about trafficking networks.