मेडिकल शॉपी फोडून रोकड भेटली नाही; चोरट्यांनी कंडोमची पाकिटे, परफ्युम बॉटेल्स पळवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:50 IST2022-08-12T11:49:58+5:302022-08-12T11:50:46+5:30
जास्त काही सापडत नसल्याने नंतर चोरट्यांनी शेल्फमधील सामानाकडे मोर्चा वळवला

मेडिकल शॉपी फोडून रोकड भेटली नाही; चोरट्यांनी कंडोमची पाकिटे, परफ्युम बॉटेल्स पळवल्या
वाळूज महानगर (औरंगाबाद): सिडको वाळूजमहागरात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एक मेडीकल दुकान फोडून कॉस्मेटिक साहित्यासह जवळपास २० हजाराचा ऐवज लांबविला आहे. या परिसरातील तीन घरे व एका इलेक्ट्रिकल दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शुभम जिवरक यांचे सिडको वाळूजमहानगरात मातोश्री मेडिकल या नावाचे औषधी विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास नागरिकांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील एक मोबाईल, रोख २ ते ३ हजार, एक चांदीची अंगठी ताब्यात घेतली. जास्त काही सापडत नसल्याने नंतर चोरट्यांनी शेल्फमधील कंडोमची पाकिटे, परफ्युम बॉटल्स यासह कॉस्मेटिक साहित्य पळवले. एकूण २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे.
तीन घरे, दुकानात चोरीचा प्रयत्न, तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद
प्रविण मुंडे, अंबादास गायकवाड व सुनील महामुनी यांच्या घरात आणि समाधान निकम यांचे श्रीनारायण इलेक्ट्रिक दुकानातही चोरट्यांनी प्रवेश केला होता. मात्र नागरिक जागी झाल्याने चोरटे रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, दुकानात चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला दांड्याने वार करुन दिशा बदलली. यावेळी ते सीसीटीव्हीत कैद झाले. तिन्ही चोरट्यांनी रुमालाने चेहरे बांधलेले असून त्यांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असे आहे. या चोरीची माहिती मिळताच उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.