पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 21:49 IST2025-03-26T21:49:36+5:302025-03-26T21:49:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टिप्पणी केली होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्वोच्च न्यायालयाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत पत्रकार निरंजन टकले यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक विचार मंचचे आप्पासाहेब पारधे (३५, रा. नुतन कॉलनी) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.
फेब्रुवारी महिन्यात शहरातील आमखास मैदानावर तीन दिवसीय १९ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या २३ फेब्रुवारी रोजीच्या रात्री ९ वाजेच्या सत्रात टकले 'संविधान आणि लोकशाहीला कॉर्पोरेट मनुवाद्यांचे आव्हान' या विषयावर विचार मांडण्यासाठी निमंत्रित हाेते. या भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टिप्पणी केली.
तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी मत मांडताना अमेरिकेचा दाखला देत पंतप्रधाननरेंद्र मोदी व सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाने वक्तव्य केले हाेते. हे वक्तव्य नागरिकांच्या भावना दुखावणारे असून सामाजिक तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करत पारधे यांनी टकले यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात टकले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्हिडिओचा तपास होणार
संमेलनानंतर पारधे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले. मंगळवारी पारधे यांनी ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवला. त्यावरुन टकले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टकले यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ उपलब्ध करून त्याचा तपास केला जाईल, असे बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी स्पष्ट केले.