जालना रोडवर भरधाव कारने बुलेटस्वारास १५ फुट फरफटत नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:53 IST2021-02-10T17:48:32+5:302021-02-10T17:53:16+5:30

मंगळवारी रात्री ११ :३० वाजेच्या दरम्यान हॉटेल रामासमोर भरधाव कारने बुलेटस्वारास उडवले.

car crushed bullet rider; Young man killed in accident on Jalna Road | जालना रोडवर भरधाव कारने बुलेटस्वारास १५ फुट फरफटत नेले

जालना रोडवर भरधाव कारने बुलेटस्वारास १५ फुट फरफटत नेले

ठळक मुद्देपोलिसांनी कार जप्त केली आहे

औरंगाबाद : भरधाव कारने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ११ ते ११ :३० वाजेच्या सुमारास जालना रोडवरील हॉटेल रामासमोर झाला.

दीपक ताराचंद हटवल (३६, रा. गांधीनगर) असे मृताचे नाव आहे. दीपक हे महापालिकेच्या स्वच्छता विभागात सुपरवायझर होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दीपक हे रोज रात्री स्वच्छता कामगारांना त्यांची कामे नेमून घरी जातात. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री ११ :३० वाजेच्या सुमारास दुचाकीने सेव्हन हिलकडून सिडको बसस्थानकाकडे जात होते. हॉटेल रामासमोर भरधाव कारने त्यांच्या मोटारसायकलला उडवले. या घटनेत ते दुचाकीसह खाली कोसळले आणि दहा ते पंधरा फूट फरपटत गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. 

या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी तातडीने सिडको पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइलवरून नातेवाइकांना कॉल करून घटनेची माहिती दिली. त्यांना गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री २:३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याविषयी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कार जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. हवालदार ढगे हे तपास करीत आहेत.

Web Title: car crushed bullet rider; Young man killed in accident on Jalna Road