निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांचा लाखोंचा खर्च वाया; ४ डिसेंबरला नवीन वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:25 IST2025-12-01T15:23:10+5:302025-12-01T15:25:02+5:30
फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक पुढे ढकलली

निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांचा लाखोंचा खर्च वाया; ४ डिसेंबरला नवीन वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, रविवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगित केली आहे. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक स्थगित होत असेल तर सगळीच प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्री नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या काही प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे. उर्वरित नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांचा लाखोंचा खर्च वाया
फुलंब्री : नगरपंचायत निवडणूक अनपेक्षितपणे पुढे ढकलल्याची माहिती रविवारी रात्री उमेदवारांना मिळताच खळबळ उडाली. मतदानासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना घेतलेल्या या निर्णयामुळे उमेदवारांना आर्थिक फटका बसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.
गेल्या दहा दिवसांपासून सर्वच उमेदवारांकडून प्रचाराची जोरदार मोहीम राबवली जात होती. वाहनफेऱ्या, प्रचार साहित्य, सभा, फिरत्या गाड्यांवरील जाहिराती, कार्यकर्त्यांचे नियोजन, निवास, भोजन, रॅली, सोशल मीडिया प्रचार या सर्वांवर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. निवडणूक पुढे ढकलल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागताच प्रचार यंत्रणा थंडावली. उमेदवारांनी लावलेले प्रचाराचे भोंगे ताबडतोब बंद केले. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीत विरोधक उमेदवार यांच्या मुलाच्या कोर्टातील प्रकरणात निर्णय उशिरा आला. त्यामुळे निवडणूक लांबली. हा प्रकार शहरवासीयांना वेठीस धरण्याचा आहे.
सुहास सिरसाट, नगराध्यक्ष पदाचे, भाजपा उमेदवार फुलंब्री.
गंगापुरात दोन प्रभागांतील दोन जागांची निवडणूक स्थगित
गंगापूर : नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील जागा क्रमांक ‘ब’ व प्रभाग क्रमांक ४ मधील जागा क्रमांक ‘ब’ येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे २ डिसेंबरला या दोन्ही प्रभागांत फक्त अध्यक्ष पदासाठी व जागा क्रमांक ‘अ’ साठीच मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ४ मधील प्रत्येक मतदाराने दोन स्वतंत्र मते देणे अपेक्षित असून, यानुसार एक मत अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी, तर दुसरे मत जागा क्रमांक ‘अ’ साठी द्यायचे आहे.
पैठणमध्ये ४ नगरसेवकांच्या निवडणुकीला स्थगिती
पैठण : नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधील २ नगरसेवकांच्या जागा, प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा, तर प्रभाग क्र. ११ मधील १ अशा चार नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलम बाफना यांनी दिली.
ही निवडणूक प्रक्रिया आता पुढे ढकलली गेल्यामुळे उमेदवारांचे सर्व नियोजन बिघडले आहे. आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला पैसा, मेहनत वाया गेली आहे. संबंधित वाॅर्डांमध्ये रविवारी सायंकाळी प्रचारतोफा अचानक थांबल्या.
वैजापुरात दोन जागेची निवडणूक पुढे ढकलली
वैजापूर : नगर परिषदेच्या १२ प्रभागांतील २५ जागांच्या निवडणुकीत २ जागांसाठीची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. प्रभाग क्र. १, १ अ व २ ब या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली. या दोन्ही जागांसाठी दाखल अपिलांचा निकाल जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारास त्याचे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी वेळ मिळाला नाही.