'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:05 IST2026-01-24T20:03:39+5:302026-01-24T20:05:10+5:30
ज्या भावाने जमीन खरेदी केली, त्याच भावाने परत करा; शेतकऱ्यांची मागणी

'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या
छत्रपती संभाजीनगर : निम्न दूधना प्रकल्पासाठी संपादित मात्र ज्या जमिनीवर पाणी साचत नाही, अशा जमिनीवर नियोजित सौर प्रकल्प रद्द करण्यात यावा. ज्या भावाने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली त्याच दराने जमीन परत करा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त २१ गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळपासून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) मुख्य अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी कडा परिसर दणाणून सोडला.
प्रकल्पासाठी संपादित जमिनीवर सौर प्रकल्प...
परभणी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पासाठी सेलू तालुक्यातील विविध गावांतील हजारो शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतरही या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात नाहीत. शेतकरी दरवर्षी पाटबंधारे विभागाला गाळभाडेपट्टा भरून जमिनी कसत असतात. आता पाटबंधारे विभागाने ही जमीन सौर ऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी महावितरण कंपनीला देण्याचा करार केला आहे. ही बाब शेतकऱ्यांना समजताच शेतकरी संतप्त झाले. सुपीक जमीन आम्ही धरणासाठी दिलेली आहे. आमच्या जमिनीवर नियोजित सौर प्रकल्प रद्द करावा. आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात, त्यासाठी शासनाने आमच्याकडून जमिनीचा मोबदला भरून घ्यावा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश राजबिंडे आणि सतीश जायकोजी निर्वळ यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनात शेकडो शेतकरी, महिला आणि तरुण सहभागी झाले आहेत. आमची जमीन परत करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, सौर प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टी जिंदाबाद, शेतकरी संघटना जिंदाबाद, आदी घोषणा देत शेतकऱ्यांनी कडा परिसर दणाणून सोडला. आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तेथेच स्वयंपाकही सुरू केला.
अभियंता, अधीक्षक अभियंता कुठे गेले ?
कडा कार्यालयात शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याचे निवेदन आधीच देण्यात आले होते. या शेतकऱ्यांना सामोरे जाण्याऐवजी मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार हे वेगवेगळ्या कारणांमुळे कार्यालयाबाहेर होते. सहायक मुख्य अभियंता राजू देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. २७ जानेवारी रोजी याविषयी बैठक आयोजित करण्यात आली आहे, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा, असे पत्र दिले आणि ते कार्यालयातून निघून गेले. शेतकऱ्यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या गावांतील शेतकरी आंदोलनात
परभणी जिल्ह्यातील रेवणगाव, सालगाव, कोंडेगाव, राणी वाहेगाव, सातोना खुर्द आणि सातोना बुद्रुक, देवळा, चिंचोली, मापेगाव, केदार वाकडी, नाणसी, मंगरूळ, गोपेगाव, वाजोळा, चांदेशोर, पाडळी, नागापूर, कोरेगाव, रोहिना खुर्द आणि बुद्रुक, तसेच करंजखेडा आदी गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.