स्वत:ला गोरक्षक म्हणवत PSIची पोलिस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून मारहाण, थेट निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:45 IST2026-02-20T17:43:27+5:302026-02-20T17:45:51+5:30
शहर पोलिस दलात कार्यरत पीएसआय नवनाथ पाटोदकर तडकाफडकी निलंबित

स्वत:ला गोरक्षक म्हणवत PSIची पोलिस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून मारहाण, थेट निलंबन
छत्रपती संभाजीनगर : स्वत:ला गोरक्षक म्हणवत शहर पोलिस दलात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) नवनाथ पाटोदकर याने फुलंब्री ठाण्याबाहेर पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकावले. अश्लील भाषेत शिवीगाळ करून गोरक्षकांच्या जमावाला पोलिसांच्या घरी जाऊन दगडफेक करण्यासाठी चिथावणी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
१८ फेब्रुवारीला मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणात फुलंब्रीचे पोलिस अंमलदार अनिल घुसिंगे यांनी शासनातर्फे याप्रकरणी तक्रार देत गोरक्षक गणेश अप्पासाहेब शेळके, सुरज कैलास जाधव, उपनिरीक्षक पाटोदकरवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीतील आरोपानुसार, सावंगी शिवारात मंगळवारी रात्री ९ वाजता गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडवून पोलिसांना कळवले. निरीक्षक संजय सहाणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुढील कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप करू नका, अशी समज पोलिसांनी गोरक्षकांना दिली. शेळके व इतरांनी मात्र पोलिसांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ‘तुम्ही माझ्यावर यापूर्वी गुन्हा का दाखल केला’, असे म्हणत पिकअप व्हॅनची पोलिसांसमक्ष तोडफोड करून पेट्रोलने पेटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शेळकेने निरीक्षक सहाणे, सहायक पोलिस निरीक्षक मुऱ्हाडे यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले. उपनिरीक्षक चाटे, अंमलदार शिंदे यांचा गळा पकडून मारहाणही केली.
ठाण्याबाहेरील जमावात उपनिरीक्षक आक्रमक
- पोलिसांनी बळाचा वापर करुन शेळके व अन्य गोरक्षकांना ताब्यात घेऊन फुलंब्री पोलिस ठाण्यात नेले. मात्र त्यानंतर ठाण्याबाहेर १५० ते २०० जणांचा जमाव जमला. त्या जमावात पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटोदकर साध्या वेशात होता.
- ‘मी आधी गोरक्षक आहे’, असे म्हणत तो पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांची नोकरी घालवण्याची धमकी दिली.
- ‘तुम्ही एकटे कसे फिरता, तेच पाहतो’, असे म्हणत जमावाला पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांवर रात्री दगडफेक करण्यासाठी चिथावणी दिली. त्यानंतर अंमलदार अनिल घुसिंगे यांना मारहाण केली.
१२ गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पाटोदकर, गणेश शेळके, सुरज जाधव, पवन जंजाळसह २० जणांवर बीएनएसच्या गंभीर बारा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फुलंब्री पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड यांनी पोलिस करमाड पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे.
उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित
पोलिस उपनिरीक्षक पाटोदकर पूर्वी चिकलठाणा पोलिस ठाण्यात कार्यरत असतानाही वादग्रस्त ठरला होता. काही महिन्यांपूर्वी त्याची शहर पोलिस दलात बदली होऊन थेट गुन्हे शाखेत वर्णी लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. बुधवारच्या फुलंब्रीतील या धक्कादायक घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना हा प्रकार कळवला. गुन्हा दाखल होताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
शेळकेचा पोलिसांवर गंभीर आरोप
दरम्यान, या प्रकरणात जनावरांची तस्करी करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेत पोलिसांनी मला गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप गणेश शेळकेने केला आहे. सध्या त्याच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिकलठाण्यात याच शेळकेवर ७ ऑक्टोबर रोजी मांस तस्करांनी प्राणघातक हल्ला करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता.