मेअखेरपर्यंत पूर्ण होईल बायपासचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:18+5:302021-02-05T04:12:18+5:30

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये संथगतीने सुरू असलेल्या नवीन बीड बायपासच्या (बाह्यवळण रस्ता) कामाने आता गती घेतली असून मे २०२१ अखेर ...

Bypass work will be completed by the end of May | मेअखेरपर्यंत पूर्ण होईल बायपासचे काम

मेअखेरपर्यंत पूर्ण होईल बायपासचे काम

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये संथगतीने सुरू असलेल्या नवीन बीड बायपासच्या (बाह्यवळण रस्ता) कामाने आता गती घेतली असून मे २०२१ अखेर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्धार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी व्यक्त केला आहे. या कामाला आलेले सर्व अडथळे संपुष्टात आले असून, सध्या या रस्त्याचे व उड्डाण पुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

पूर्वी बीड बायपास हा शहराबाहेर होता. आता वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे सध्याचा बायपास (बाह्यवळण रस्ता) शहरात आलेला आहे. या रस्त्यावर जडवाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर सध्याचा बायपास वाहतुकीसाठी अपुरा पडेल. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाने नवीन बीड बायपासचे काम सुरू केले. बीडकडून येणाऱ्या सोलापूर- धुळे महामार्गावर निपाणीपासून हा बाह्यवळण रस्ता सुरू झाला. तो पुढे सातारा डोंगराच्या अलीकडून वाल्मी, पैठण लिंकरोड (वाळूजकडे जाणारा), करोडी, माळीवाडा, कसाबखेडा मार्गे कन्नड असा गेला आहे.

सुरुवातीला हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता. परंतु, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि कंत्राटदाराला अर्ध्यावरच काम थांबवावे लागले. कोरोनाच्या भीतीपोटी या कामावरील परप्रांतीय मजुरांनी गावाकडचा रस्ता धरला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या बायपासचे काम रखडले. मात्र, अनलॉकमध्ये कंत्राटदाराने स्थानिक मजुरांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू केले. अलीकडे गावी गेलेले परप्रांतीय मजूर परतले असून सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चौकट....

नवीन बीड बायपासवर दोन उड्डाणपूल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले की, निपाणी ते कन्नडपर्यंत नवीन बीड बायपास गेला असून या रस्त्यावर वाल्मीजवळ आणि औरंगाबाद- पुणे रस्त्यावर ए.एस. क्लबजवळ असे दोन उड्डाणपूल उभारण्याची कामेही प्रगतीपथावर आहे. उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

Web Title: Bypass work will be completed by the end of May