वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरालगत होणार ४३ कोटींतून ‘बायपास’; आराखडा ११२ वरून २१० कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:09 IST2025-11-21T20:09:00+5:302025-11-21T20:09:33+5:30
निविदा आणि वर्कऑर्डरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली असून बायपास रस्त्यासह उर्वरित कामांना येत्या काही दिवसांत गती मिळेल.

वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरालगत होणार ४३ कोटींतून ‘बायपास’; आराखडा ११२ वरून २१० कोटींवर
छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरालगत ४३ कोटींतून चौपदरी बायपास होणार आहे, तसेच मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार असून त्यासाठी वाढीव निधीला गुरुवारी उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली. ५३ कोटी रुपयांचा वाढीव निधी शासनाने मंजूर केला असून आता १५६ वरून २१० कोटींतून मंदिरालगतच्या भागाचा विकास होणार आहे.
निविदा आणि वर्कऑर्डरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली असून बायपास रस्त्यासह उर्वरित कामांना येत्या काही दिवसांत गती मिळेल. मुख्य सचिव राजेशकुमार, सचिव वेणुगोपाल रेड्डी हे ऑनलाइन तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन अधिकारी भारत वायाळ हे येथून बैठकीला उपस्थित होते. १५६ कोटींच्या आराखड्यात ९१ कोटींची वाढीव मागणी प्रशासनाने केली होती. ११२ कोटींवर २१० कोटी रुपयांपर्यंतची कामे नव्याने टाकून परिपूर्ण आराखडा तयार केला. बहुतांश कामांना गती दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी स्वामी यांच्यावर कौतुकाची थाप टाकली.
कुठली कामे होणार?
भक्तनिवास, दर्शनबारी, फंक्शन हॉल, व्यावसायिक कॉम्पलेक्स, उद्यान, लाईट ॲण्ड साऊंड शो, घाट सुशोभिकरण, पार्किंग ही कामे करण्यात येणार आहेत. तसेच मंदिराच्या आतील प्रशासकीय कार्यालय बाहेर हलविण्यात येणार आहे. २०१८ पासून कागदावर आलेल्या या प्रकल्पाला जानेवारी २०२५ पासून खऱ्या अर्थाने गती मिळाली.
२१० कोटींच्या आराखड्यात कोणती कामे होणार?
११२ कोटींतून सार्वजनिक बांधकाम विभाग, ४३ कोटींतून बायपास रस्ता, पुरातत्व विभागाच्या हद्दीत १३ कोटींची कामे होतील. महावितरण, एमटीडीसी, विद्युत विभाग, जीवन प्राधिकरणांच्या कामांचा आराखड्यात समावेश आहे.