उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरण: अंबाजोगाईतून आणखी एक आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:58 IST2025-06-24T14:57:43+5:302025-06-24T14:58:28+5:30

गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपी निष्पन्न केले आहेत.

Businessman Santosh Ladda robbery case: Another accused arrested from Ambajogai | उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरण: अंबाजोगाईतून आणखी एक आरोपी जेरबंद

उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरण: अंबाजोगाईतून आणखी एक आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर भागातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी टाकलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतून आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठाेकल्या आहेत. या आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले असता, २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

राजेश श्रीकृष्ण साठे (३०, रा. भटगल्ली, अंबाजोगाई, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी १५ मे रोजी मध्यरात्रीनंतर सहा आरोपींनी धाडसी दरोडा टाकला होता. त्यात साडेपाच किलो सोन्याचे दागिने, ३२ किलो चांदीचे दागिने व भांडी, ७० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखा प्रकरणाचा तपास करीत आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यात मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला. त्याचवेळी अटकेतील आरोपींची संख्या २०वर गेली आहे. अंबाजोगाई येथून अटक केलेला राजेश साठे हा सुरेश उर्फ सूर्यकांत गंगणे याच्यासह मृत अमोल खोतकर या दोघांचा मित्र होता. दरोड्याच्या दिवशी तो त्यांच्यासोबतच होता. त्याच्याकडेही चोरीतील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल असण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्यासह हवालदार संदीप तायडे, अंमलदार विलास मुठे, संतोष चौरे यांच्या पथकाने साठे यास अंबाजोगाईतून उचलले.

आरोपींची संख्या वाढणार
गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले प्रमुख आरोपी अतिशय कुख्यात असल्यामुळे कोणीही माहिती देण्यास पुढे येत नाही. त्याचवेळी मृत अमोल खोतकर याच्या बहिणीच्या चौकशीत ३२ किलो चांदीचे दागिने आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्याशिवाय चोरीतील अर्धा किलोपेक्षा अधिक सोनेही परत मिळवले आहे. उर्वरित सोने हस्तगत करण्यासाठी काही महिलांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Businessman Santosh Ladda robbery case: Another accused arrested from Ambajogai