बऱ्हाणपूरच्या भाविकांचा सिल्लोडजवळ अपघात; स्टेरिंगरॉड तुटल्याने जीप उलटली, चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:39 IST2025-03-20T18:38:18+5:302025-03-20T18:39:01+5:30
भरधाव जीप स्टेरिंगरॉड तुटल्याने दुभाजकाला धडकून उलटली. चालकाचा जागीच मृत्यू, ११ प्रवासी जखमी

बऱ्हाणपूरच्या भाविकांचा सिल्लोडजवळ अपघात; स्टेरिंगरॉड तुटल्याने जीप उलटली, चालकाचा मृत्यू
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): तालुक्यातील निल्लोड फाट्यावर भरधाव जाणाऱ्या जीप (क्रमांक एमपी ६८ झेडडी ३०२७ ) अचानक स्टेरिंगरॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर धडकली. या अपघातात जीप चालक जागीच ठार झाला तर ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. हा अपघात आज पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील निल्लोड फाट्यावर झाला.
बऱ्हाणपूर येथील भाविक चार जीपमधून कानिफनाथ यांचे दर्शन करण्यासाठी बुधवारी नगर जिल्ह्यात आले होते. दर्शन झाल्यानंतर सर्व भाविक रात्री परत बऱ्हाणपूरकडे निघाले. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील निल्लोड फाट्यावर पहाटे ३. ३० वाजता भरधाव वेगातील एक जीप स्टेरिंगरॉड तुटल्याने दुभाजकावर धडकली. पाठीमागून येणाऱ्या इतर भाविकांच्या निदर्शनास अपघात आला. जीप थांबवून भाविकांनी अपघाताची माहिती वडोद बाजार पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक बाप्पासाहेब झिंझुरडे, पोहेकॉ धनराज खाकरे पाटील, शैलेश गोरे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाल , डॉ. अजिंक्य इंगोले यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी काहीं जखमींना छत्रपती संभाजीनगर, तर काहींना बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ धनराज खाकरे पाटील हे या अपघाताचा तपास करत आहे.
मृत आणि जखमी मध्यप्रदेशातील
मृत जीप चालकाचे नाव नारायण कडू सपकाळ ( ५३ वर्ष रा. निमगावरेहता ता.जि. बऱ्हाणपूर राज्य (मध्यप्रदेश) असे आहे. तर गंभीर जखमी प्रवाशांचे नावे अशी: योगेश बाबुराव कोल्हे वय ३० वर्ष रा. शिरगाव बऱ्हाणपूर , रुपचंद लहानु कोल्हे वय ४० वर्ष रा. शिरगाव ,सोपान बाबुराव महाजन वय ६० वर्ष रा.हाथरुन ,योगेश काशिराम धनगर वय ४० वर्ष रा.हाथरुन ,तनीषा कृष्णा चौधरी वय १६ वर्ष रा. शाहपुर ,वैष्णवी कैलास पाटिल वय १७ वर्ष रा.अतनुर ,कार्तिक कैलास पाटिल वय २० वर्ष रा.अतनुर ,दुर्गाबाई कैलास पाटिल वय ४० वर्ष रा.अतनुर ,अनुष्का योगेश धनगर वय १२ वर्ष रा.अतनुर ,सुवर्णा कृष्णा चौधरी वय ३५ वर्ष रा. शाहपुर , विशाल विलास पाटील वय २४ वर्ष रा.अतनूर बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) असे आहे.