ड्रग्ज पेडलर्सच्या मालमत्तावर आता बुलडोझर चालणार; छ. संभाजीनगर पोलिसांचा प्रस्ताव तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:06 IST2026-02-14T18:03:35+5:302026-02-14T18:06:37+5:30
गुन्हे शाखा प्रस्ताव तयार करून महानगरपालिकेला सादर करणार

ड्रग्ज पेडलर्सच्या मालमत्तावर आता बुलडोझर चालणार; छ. संभाजीनगर पोलिसांचा प्रस्ताव तयार
छत्रपती संभाजीनगर : शहरात फोफावलेले अमलीपदार्थांचे रॅकेट मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी शहर पोलिसांनी आता या पेडलर्स, एजंटच्या अन्य अवैध मालमत्ता, अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील मोस्ट वाॅण्टेड ड्रग्जविक्री करणारे पेडलर्स, एजंट असे मिळून ४६ पेक्षा अधिकांऱ्यांची यादी तयार केली आहे. अतिक्रमण, अवैध मालमत्तांसह थकीत कर, पाणीपट्टी असल्यास त्यावर कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात येईल.
गेल्या वीस दिवसांपासून शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांनी विविध प्रकारच्या ड्रग्सच्या पेडलर्स, स्मगर्लचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. २५ जानेवारी रोजी पहिल्या कारवाईनंतर ७ फेब्रुवारीपर्यंत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकाने १६ जणांना अटक केली. १३ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशफाक पटेल सध्या पसार असून, आता त्याच्यासह त्याच्या साथीदारांच्या बेकायदा मालमत्ता आणि घरांवर बुलडोझर चालविण्याची तयारी गुन्हे शाखेने केली आहे. या संदर्भात पोलिस लवकरच महापालिकेकडे आरोपींच्या नावांसह त्यांच्या निवासस्थानाचे पत्ते, अन्य मालमत्तांची माहिती असलेला सविस्तर प्रस्ताव पाठविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.