अट्टल गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या; चार संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 17:35 IST2021-11-10T17:34:00+5:302021-11-10T17:35:34+5:30
आज सकाळी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कडेला ग्रीनझोनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अट्टल गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या; चार संशयित ताब्यात
औरंगाबाद : शहरातील जळगाव रोडवर आज सकाळी एका अट्टल गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या करत मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे आढळून आले. मारेकऱ्यांनी चेहरा विद्रूप केल्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविण्यास अडचण आली. दरम्यान, मृतदेह अट्टल गुन्हेगार अबू बकर चाऊस याचा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
आज सकाळी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कडेला ग्रीनझोनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता दोन्ही डोळे फोडून चाकूने वार करत चेहरा विर्दुप केला होता. यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवता आली नाही. दरम्यान, मृतदेह अट्टल गुन्हेगार अबू बकर चाऊस याचा असल्याचे खबऱ्यांनी दिलेल्या माहितीची पुष्टी करून पोलिसांनी सांगितले.
शहरातील विविध पोलीस ठाण्यात अबू बकर चाऊस याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारीची नोटीसही अनेकदा पोलिसांनी बजावली होती. पोलिसांनी अबू बकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी चार संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले असून पुढील प्तास सुरु आहे.