लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:02 IST2025-06-06T14:59:19+5:302025-06-06T15:02:28+5:30

तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी तिसगावमधील ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन खरेदी केली होती.

Bribery Resident Deputy Collector Vinod Khirolkar out of jail after ten days, Additional Tehsildar Garje still at large | लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर

छत्रपती संभाजीनगर : शासनाची वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ करून देण्यासाठी नियमानुसार शासनाकडे काही रक्कम भरावी लागते. या कामासाठी फक्त चलन देण्यासाठी लाच स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि त्यांचा महसूल सहायक दिलीप त्रिभुवनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ मे रोजी रंगेहाथ अटक केली होती. यात दहा दिवसांनंतर न्यायालयाने तीन अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर खिरोळकरचा जामीन मंजूर केला.

तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी तिसगावमधील ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन खरेदी केली होती. त्याचे रजिस्ट्री खरेदीखतही करून घेतले. वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी पैसे भरावे लागतात. या प्रक्रियेसाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी त्यांच्याकडून यापूर्वी २३ लाख रुपये घेतले होते. पुन्हा चलन देण्यासाठी १८ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडून सतत पैशांसाठी होत असलेल्या छळाला कंटाळून अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांनी तक्रार केली होती. त्यावरून निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी २७ मे रोजी सापळा रचून त्रिभुवनला ५ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

२७ मेपासून कारागृहात असलेल्या खिराळकरने जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी गुरुवारी त्याचा जामीन मंजूर केला. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकाऱ्यासमक्ष चौकशीसाठी वेळोवेळी हजर राहावे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशा प्रमुख अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.

गर्जे सारखा पळतोय
१६ मे रोजी महसूल विभागाचाच अपर तहसीलदार नितीन गर्जे लाचेच्या सापळ्यात निष्पन्न झाला. मात्र, पार्किंगमध्ये एजंट नितीन चव्हाण व सोहेल जुबेर बहाशवानला अटक होताच तो दालनातून पसार झाला. तेव्हापासून गर्जे कुटुंबासह पसार आहे. अटकपूर्व जामिनासाठी तो खटाटोप करत आहे. वारंवार मोबाइल क्रमांक व जागा बदलत असल्याने तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Bribery Resident Deputy Collector Vinod Khirolkar out of jail after ten days, Additional Tehsildar Garje still at large