लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:04 IST2025-06-05T12:04:30+5:302025-06-05T12:04:50+5:30
मंजूर संचिकांची चौकशी सुरू, दस्तऐवज घेतले ताब्यात ; खासगी वसुली एजंटांनीच केले अनेक व्यवहार

लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण?
छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यांना लाचखोरीच्या प्रकरणात २७ मे रोजी अटक झाल्यानंतर या जोडगोळीच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी बुधवारपासून सुरू झाली. यात ‘के. एम.’ या एजंटचे नाव वारंवार पुढे येत आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्यासह त्रिसदस्यीय समिती नियुक्त आहे. समितीला मंगळवारी स्वतंत्र आदेशाची प्रत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. खिरोळकर, त्रिभुवन यांनी संचिका कशा मंजूर केल्या, याची चौकशी करण्यासाठीचे आदेश मंगळवारी मिळाले. पूर्ण दस्तऐवज, मंजुरीच्या आदेशांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे, असे चौकशी समितीचे अध्यक्ष अडकुणे यांनी सांगितले. लोकमतच्या वृत्तातून याचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने समिती नेमली आहे. जिल्ह्यात वर्ग-२ मध्ये असलेल्या गायरान जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा सपाटा लावल्याने खिरोळकर व गँग लाचेच्या जाळ्यात अडकली. ८८ च्या आसपास प्रकरणे त्यांच्या काळात मंजूर केल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती सर्व समोर येईल.
‘के. एम.’ नावाच्या एजंटची जास्त चर्चा....
देवाण-घेवाण करण्यासाठी काही खासगी एजंट नेमले होते. त्यात ‘के. एम.’ नावाच्या एजंटची जास्त चर्चा आहे. तोच व्हॉट्सअप कॉल करून सर्व काही ठरवत असे. खिरोळकरांच्या दालनातून एक विशिष्ट चिठ्ठी त्याला मिळाल्यानंतर पुढील निर्णय होत असत. लाचलुचपत विभागाकडून देखील चौकशी समिती कॉल रेकॉर्डिंगची माहिती घेत आहे. कोणत्या एजंटकरवी व्यवहार झाले आहेत, त्यात प्रशासनातील किती जणांचा सहभाग होता, याची माहिती चौकशीअंती समोर येईल.
तलाठी महासंघाने केली होती तक्रार
खिरोळकर आणि चमूने तर प्रशासन पूर्णत: ताब्यात घेतले होते. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्यांमध्ये धुमाकूळ घातल्याने तलाठी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सगळ्या आर्थिक उलाढालीची माहिती दिली होती. तलाठ्यांना मर्जीतील ठिकाण देण्यासाठी एका सलून अकादमीतून प्रशासकीय निर्णय झाल्याची चर्चा त्यावेळी होती. यंदा १८९ बदल्यांपैकी काहींमध्ये व्यवहार पूर्ण झाले होते. परंतु, खिरोळकर अडकला, त्याचे पंटर पसार झाल्यामुळे अनेकांची रक्कम बुडाली आहे.